सांगोला तालुक्यात वृद्धेनंतर आता बकरी, शेळ्यांवर तीन तरसांकडून पावसात हल्ला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : तीन तरस प्राण्यांनी दिवसा पावसात बकरी व शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला तर तीन शेळ्यांसह एक बोकड जखमी झाले.
एवढ्यावरच न थांबता म्हशीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महारनवर कुटुंबासह जमावाने तरसांना हुसकावून लावले.
ही घटना शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास महूद चिकमहूद रस्त्यालगत घडली. शनिवारी मध्यरात्री महूद अंतर्गत ७० फाट्यावर तरसाने घरात घुसून ६५ वर्षीय वृद्ध महिला रकमाबाई येडगे यांच्यावर हल्ला करून जखमी केले होते.
ही घटना ताजी असताना तरसांनी पुन्हा चिकमहूद येथे जनावरांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांसह पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे.
चिकमहूद येथील वैभव महारनवर यांनी घराशेजारी म्हैस, बकरी व शेळ्या बांधल्या होत्या. शनिवार, ७ जून रोजी सकाळी पाऊस सुरू होता. त्यावेळी वैभव
हा गावात दुकानात होता तर भाऊ विलास हा नातेवाईकासह घरात होता. शेळ्या व बकऱ्यांचा आवाज ऐकून विलास घराबाहेर आला. विलासने काठी घेऊन तरसाच्या तावडीतून शेळ्या व बकऱ्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, वैभव हा पावसातच धावत आला. दोघा भावांनी मिळून त्या तरसांना हुसकावून लावले. परंतु तरस पुन्हा त्याच ठिकाणी येऊन शेळ्या व बकऱ्यांना हल्ल्याचा प्रयत्न करीत होते. त्यादरम्यान एका बकरीचा जागीच मृत्यू झाला.
तिसऱ्या तरसाने शेळ्या व बोकडांना चावा घेतला. त्यानंतर म्हशीवरही हल्ल्याचा प्रयत्न करू लागला, शेवटी आजूबाजूच्या ४० लोकांच्या जमावाने तिन्ही तरसांना हुसकावून लावले.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जखमी शेळ्या व बोकडावर उपचार केले. दरम्यान तरसांच्या भीतीपोटी महारनवर कुटुंबीयांनी शनिवारची
रात्र जागूनच काढली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी वन कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत चौकशी केली.
0 Comments