मला लय लागलंय गं, आजी मला सोडून जाऊ नको; दुचाकीनं धडक दिल्यानं जखमी, ६ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील घटना..
आजीसोबत निघालेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला दुचाकीनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. सोलापुरात गेंट्याल चौकात ही घटना घडली. दुचाकीनं धडक देताच शिवांशू हा गंभीर जखमी झाला होता.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं पण उपचारावेळीच त्याची प्राणज्योत मालवली. शिवांशू लक्ष्मीनारायण बोद्धूल असं चिमुकल्याचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवांशू त्याच्या आजीसोबत जात असताना त्याचा टी शर्ट दुचाकीच्या हँडलमध्ये अडकला. यावेळी दुचाकीचा ब्रेक न लागल्यानं शिवांशू दुचाकीसोबत फरफटत गेला.
यात तो गंभीर जखमी झाला होता. दवाखान्यात नेताना आजी मला लय लागलंय गं, मला सोडून जाऊ नकोस असं तो बोलला होता. त्याचे हे शब्द अखेरचे ठरले.
सोलापूरमध्ये गेंट्याल चौकात शनिवारी दुचाकीनं शिवांशूला धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. अपघातानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. गंभीर अवस्थेत शिवांशू बोलत होता.
त्यावेळी आजीला तो मला सोडून जाऊ नको, मला लय लागलंय असं म्हणाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्याला वाचवता आलं नाही.
शिवांशूच्या मृत्यूनंतर आजीने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. गंभीर जखमी झालेला माझा नातू उपचार सुरू असताना गेला असं म्हणत आजीनं हंबरडा फोडला. शिवांशूला डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला होता.
त्याला खासगी रुग्णालयात प्रथमोपचारानंतर सरकारी रुग्णालयात नेलं होतं. सरकारी रुग्णालयात इतर फॉरमॅलिटी पूर्ण करण्यात वेळ गेल्यानं वेळेत उपचार मिळू शकले नसल्याचं आजींनी सांगितलं.
आजीने सांगितलं की, मी नातू शिवांशू आणि नात वैभवीला घेऊन सोलापुरात सरस हॉटेलसमोर रिक्षातून उतरले. वैभवीला कडेवर घेतलं होतं.
शिवांशूनं माझा हात धरला होता. त्यावेळी गेंट्याल चौकाकडं येणाऱ्या दुचाकीनं शिवांशूला धडक दिली. यात शिवांशूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
0 Comments