खळबळजनक प्रकार! बोगस डॉक्टरवर कारवाई; डॉक्टरने बीपी तपासून तुम्हाला इंजेक्शन देवू का? गोळ्या देऊ? विचारलं अन् काय घडलं...
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या पथकाने छापा टाकून बोगस डॉक्टरवर कारवाई केली.
तालुका वैद्यकीय अधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक वाघमोडे (रा. तिरवंडी) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. गोरडवाडी येथे एका डॉक्टरने दवाखाना सुरू केला होता. या डॉक्टरच्या विरोधात आरोग्य विभागाकडे हा डॉक्टर बोगस असल्याबाबत निनावी अर्ज आला होता.
या अर्जाची दखल घेऊन पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका शिंदे यांनी पंचायत समितीचे कर्मचारी शहाबाज शेख व चालक शहाजी चव्हाण यांना बरोबर घेऊन सदर डॉक्टरच्या दवाखान्यात रुग्ण म्हणून पाठविले.
त्यावेळी डॉक्टरने बीपी तपासून तुम्हाला इंजेक्शन देवू का? गोळ्या देऊ? असे विचारून त्याच्या जवळची गोळी दिली.
त्यावेळी चालक शहाजी चव्हाण यांनी डॉ. शिंदे यांना फोन करून सदर इसम डॉक्टरची वेशभूषा परिधान करून बसलेला आहे, असे सांगितले.
त्यानंतर डॉ. शिंदे व पोलिस कॉन्स्टेबल सतीश रोकडे यांनी दवाखान्यात प्रवेश करून सदर डॉक्टरकडे डॉक्टरची डिग्री आहे का विचारले?
त्यावेळी या डॉक्टरने माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसून माझे हॉस्पिटल जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार नोंदणीकृत नाही, असे सांगितले.
त्यावेळी त्याला ताब्यात घेरून साहित्य जप्त केले. बोगस डॉ. अभिषेक वाघमोडे यांच्यावर माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments