google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..दरोड्याचा बनाव अन् बायकोचा खून!

Breaking News

धक्कादायक..दरोड्याचा बनाव अन् बायकोचा खून!

धक्कादायक..दरोड्याचा बनाव अन् बायकोचा खून!


कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुशांत गुरव (वय ३५) याने कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणीतून आपल्या पत्नीचा खून केला आणि तो दरोडा असल्याचे भासवले; 

मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सुशांतचे पितळ उघडे पाडले. पत्नीच्या खूनप्रकरणी त्याला अटक केली. दरोड्याचा बनाव करण्यासाठी घरातून चोरलेले दागिनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सुशांत हा अल्पशिक्षित; मात्र आपल्या वक्तृत्वाची छाप तो समोरच्यांवर पाडत होता. गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो वारकरी सांप्रदायात असल्याने गावोगावी कीर्तन सांगत होता.

 मवाळ भाषा, अंगाने धष्टपुष्ट असलेल्या सुशांतच्या बोलण्यामुळे अनेकजण त्याच्यावर विश्वास ठेवत होते. आजोबा व वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. आजाराने ग्रस्त असलेल्या आईचा तो सांभाळ करत होता.

पत्नी पूजाचीही त्याला चांगली साथ होती. सुदैवाने त्यांना दीड वर्षापूर्वी जुळी मुले झाली होती. सुशांत वारकरी सांप्रदायात असल्याने मुलांची नावे सोपान व मुक्ता अशी ठेवली होती. 

गुरव कुटुंबीय अगदी सुखात संसार करत होते; मात्र कीर्तन सांगणाऱ्या सुशांतने बाहेर अनेक आर्थिक व्यवहार केले होते. त्यातून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. 

पत्नीचे दागिने बँकेत ठेवून आपले कर्ज फेडायचे असे, त्याने ठरवले होते; मात्र सुशांतचा उधळा स्वभाव, त्यातून अल्प कमाई यामुळे आपले दागिने सुशांतकडे देण्यास पूजा तयार नव्हती. त्यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

दरम्यान रविवारी रात्री उशिरापर्यंत सुशांत मोबाईलवर चॅटिंग करत होता. या दरम्यान पत्नीशी त्याचा वाद झाला. या वादानंतर सुशांतने पत्नीकडे दागिन्यांची मागणी केली. 

मात्र पूजा दागिने देण्यास तयार नसल्याने त्यांच्यातील वाद वाढला. रागाच्या भरात सुशांतने काठीचे फटके पूजाच्या डोक्यात मारल्यामुळे ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने यातच पूजाचा मृत्यू झाला.

कीर्तनात वेगवेगळे दाखले देणाऱ्या सुशांतने आपण या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी हा दरोडा होता, असे दाखवण्याचे ठरवले. त्यामुळे त्याने स्वतःच्या अंगावर ओरखडे ओढून घेतले. 

पत्नीच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने व ९० हजारांची रोकड एका पिशवीत भरून ती लपवून ठेवली. आपल्या घरात दरोडा पडला, असे ओरडत तो लहान मुलांना काखेत घेऊन रस्त्यावर आला. रात्री अडीच वाजता त्याने गल्लीतील लोकांना उठवले.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी संशयित सुशांतला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली, 

मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊन तपास भरकटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याला प्रसाद दिल्यावर त्याने दरोड्याचा बनाव केल्याची कबुली दिली आहे.

Post a Comment

0 Comments