ब्रेकिंग न्यूज..शेकाप मधील बडे नेते भाजपच्या संपर्कात, लवकरच पक्षप्रवेशाची शक्यता
शेकापचे जुने शिलेदार आता भाजपच्या विचारसरणीकडे;शेकापला आत्मचिंतन करण्याची वेळ
सांगोला : सांगोल्यात भाजपच्या एका कार्यक्रमात शेकाप (शेतकरी कामगार पक्ष) मधील अनेक मान्यवर उपस्थित राहिल्याने तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेकापमधील अनेक नेते भाजपच्या नेत्यांच्या जवळीक साधताना दिसत असून, लवकरच या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगोल्यामधील भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक
निंबाळकर, आमदार चित्राताई वाघ, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राम सातपुते अशा वरिष्ठ नेत्यांसह अनेक जण उपस्थित होते. भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता.
जरी हा भाजप पक्षाचा कार्यक्रम असला तरी पालकमंत्र्यासह शेकाप पक्षामधील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावली. शेकापमधील काही ज्येष्ठ नेते व्यासपीठावर बसले होते.
भाजपच्या कार्यक्रमांना शेकापमधील नेत्यांची उपस्थिती हेच दाखवून देते की, ते आता नव्या राजकीय प्रवासासाठी सज्ज होत आहेत. विशेष म्हणजे, स्व. गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मातब्बर
नेत्यांसोबत काम केलेले शेकापचे जुने शिलेदार आता भाजपच्या विचारसरणीकडे वळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये शेकापचे हे नेतेमंडळी भाजपच्या वरिष्ठांसोबत एकत्रित दिसून आले आहेत.
पालकमंत्र्यांचे भाजप प्रवेशाचे संकेत –
सांगोल्यातील या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भाजप पक्ष वाढीसाठी सध्या अनेक ठिकाणी काम सुरू आहे.
पक्षातीलच नव्हे तर इतर पक्षांमधीलही अनेक नेते भाजपसोबत काम करण्यास इच्छुक आहेत. लवकरच ते पक्षात सामील होतील, ही आमची अपेक्षा आहे.
” त्यांच्या या वक्तव्यानंतर शेकापमधील अनेक बड्या नेत्यांचा भाजपप्रवेश निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तालुक्यातील राजकारणाचा नवीन प्रवाह कशा दिशेने वाहतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे दोघेही या हालचालींच्या केंद्रस्थानी असून,त्यांच्याशी नित्यसंपर्कात राहून शेकापमधील काही माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होण्यासाठी तयारीत आहेत.
स्थानिक कार्यक्रमांबरोबरच मुंबईतही कामानिमित्त, सत्कारानिमित्त शेकाप व भाजपचे अनेक वरिष्ठ नेतेमंडळी एकत्रित दिसून आले आहेत.
भाजपबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांबरोबरही सलगी –
शेकापासून दुरावलेले अनेकजण सध्या भाजप बरोबरच शिवसेनेच्या नेत्यांबरोबरही त्यांची मैत्री असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर शेकापमधील अनेक मोठे नेते एकत्रित दिसून येत आहेत.
शेकाप पक्षापेक्षा भाजप – शिवसेनेच्या नेत्यांबरोबरच हे नेते जास्त काळ दिसून येत असल्याने लवकरच शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकून हे नेतेमंडळी भाजपमध्ये निश्चितपणे सामील होतील हेच यावरून दिसून येत आहे.
शेकापला आत्मचिंतन करण्याची आली वेळ –
गेल्या वेळेस विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर यावेळी शेकाप पक्षाने आमदारकी खेचून आणली. अनेक सत्तास्थाने शेकापकडे असतानाही स्व. गणपतराव देशमुख यांच्याबरोबर काम केलेले
अनेक जुने शिलेदार पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. या पक्षप्रवेशाबद्दल पुरोगामी विचारसरणीच्या शेकापला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
0 Comments