मोठी बातमी..".तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते", शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
“२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते”
असे वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.
“मागच्या वेळेस मी निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे अडीच वर्षे आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले होते”, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यातील एका कार्यक्रमात म्हणाले, “मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री झाले असते.
१९९५ ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलो.
तेव्हा उद्धव ठाकरे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी उठाव केला आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
दरम्यान, शहाजीबापू पाटील म्हणाले, “माझी रास ही शिवसेनेची आहे, तरीदेखील मी कसा काय काँग्रेसकडे गेलो मला माहिती नाही. मी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा घेऊन उतरलो आणि जिंकलो आहे.”
बाबासाहेब देशमुखांकडून शहाजीबापू पाटलांचा २५ हजार मतांनी पराभव
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानभा
मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटलांचा २५,३८६ मतांनी पराभव केला आहे. देशमुखांना १,१६,२५६ तर पाटलांना ९०,५७० मतं मिळाली होती.
तर, २०१९ च्या निवडणुकीत पाटलांनी शेकापच्या अनिकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव केला होता. शहाजीबापूंना ९९,४६४ तर अनिकेत देशमुखांना ९८,६९६ मतं मिळाली होती.
अन् शहाजी बापू पाटलांनी भर सभेत स्वत:च्या तोंडात चापट मारून घेतली
अलीकडेच एका भाषणात बोलताना शहाजीबापू म्हणाले होते की "ज्यांनी सांगोल्याचं पाणी आडवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं. पण ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं, त्यांना तुम्ही घरी बसवलं.
त्यामुळे आपल्यालाही काहीतरी वाटायला पाहिजे, आपल्या या चुकीमुळे आपण तोंडात मारून घ्यायला पाहिजे", असं म्हणत त्यांनी भरसभेत स्वत:च्या तोंडात मारून घेतलं”.
0 Comments