सांगोला तालुक्यातील उदनवाडी खून प्रकरणातील आरोपी बिरू पांढरे यांना जन्मठेप ; ५ हजारांचा दंडही ठोठावला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी जमीनीच्या वादातून गोळीबार करून एकास ठार मारल्याप्रकरणी आरोपी बिरू पांढरे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तसेच ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी हा निकाल दिला.
उदनवाडी (ता. सांगोला) येथील गट क्रमांक ६८ मध्ये १९ जुलै 2014 रोजी सकाळी आकरा वाजता ही घटना घडली. फिर्यादी दत्तात्रय पांढरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर आरोपी बिरू पांढरे व इतरांनी जमाव जमवून हल्ला केला.
आरोपी बिरू पांढरे, जो भारतीय लष्करात नोकरीस होता, त्याने स्वतःकडील बंदुकीतून गोळीबार करून उज्वला पांढरे हिला ठार मारले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना लोखंडी पाईप व दगडफेकीने जखमी केले.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात १९ जुलै २०१४ रोजी भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, आर्म्स ॲक्ट ३, २५ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी तपास करून आरोपीविरुद्ध पंढरपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सर्व पुरावे विचारात घेत आरोपी बिरू पांढरे याला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
इतर आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. यात सरकारी वकील म्हणुन ॲड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी केला.
ठळक बाबी –
– आरोपी बिरू पांढरे भारतीय लष्करात नोकरीस असून तो मुलाच्या बारशासाठी गावी आला असताना वाद झाला.
– गोळीबार करून उज्वला पांढरे हिला ठार मारल्यानंतर आरोपी सुमारे ६ महिने फरार होता. पोलीसांनी वेशांतर करून शोध घेतल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
– गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त होऊ शकली नाही. आरोपीने ती विहिरीत टाकल्याचे सांगितले, मात्र पोलीसांना ती मिळाली नाही.
– आरोपीला अटक झाल्यापासून जामीन मंजूर झाला नव्हता.
0 Comments