धक्कादायक..! मुलाकडून पोटगी मिळत नाही; वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न;
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले विष; प्रकृती...
मुलाकडून दर महिना दहा हजारांची पोटगी मिळण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी आदेश दिले असून, अद्याप मुलाकडून पोटगी मिळेना.
पोटगी मिळवून देण्याची मागणी करत एका वृद्ध पित्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
औषध घेतल्यानंतर पोटात त्रास सुरू झाला. त्यामुळे संबंधित वृद्धांनी ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यामुळे एकच गोंधळ उडाला.
अधिकाऱ्यांनी वृद्धास उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. दुपारी पावणेतीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली.
सोपान वासुदेव राऊत (वय ७०, रा. अरण, ता. माढा) असे या वृद्धाचे नाव आहे. राऊत यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांनी दिली.
कुर्डवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे पोटगीचा विषय होता. प्रांताधिकाऱ्यांनी राऊत यांच्या बाजूने निकाल दिला. दर महिना दहा हजारांची पोटगी मुलाने वडील सोपान राऊत यांना द्यावी, असा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला.
या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार घेऊन सोपान राऊत यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विषारी औषध प्राशन केले. त्यापूर्वी ते कोणालाही भेटले नाहीत. तक्रारीची पूर्वकल्पनाही दिली नाही.
घटना जिल्हाधिकाऱ्यांनी घडल्यानंतर कुईवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांशी बोलून राऊत यांना पोटगी मिळवून देण्याची सूचना केली, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
0 Comments