खळबळजनक! मुलं कामावर ठेवल्याने सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल मालकांवर गुन्हा, कामगार आयुक्तांची कारवाई; बालकामगाराला घेतले ताब्यात
सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये १२ हजार पगार असलेल्या एका बालकामगाराला ताब्यात घेऊन, संबंधित मालक व ठेकेदार या दोघांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
लकी चौक मुरारजी पेठ येथील एका हॉटेलमध्ये बालकामगार असल्याची माहिती सहायक आयुक्तालयातील कामगार दुकान निरीक्षक उज्ज्वल चक्रपाणी सूर्यवंशी (वय ५३, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, तालुका पोलिस ठाण्याच्या पाठीमागे) यांना मिळाली.
माहितीवरून त्यांनी फौजदार चावडी पोलिस, चाईल्ड हेल्प लाईन यांच्या मदतीने हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली. तेव्हा तेथे त्यांना हा बालकामगार आढळून आला. त्याचे आधार कार्ड तपासले असता वय १७ वर्षे सात महिने १० दिवस असल्याचे आढळून आले.
चिंचोळी एमआयडीसीत तीन बालकामगारांना घेतले ताब्यात
मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी येथील मिनरवा फुड्स या कंपनीत काम करणाऱ्या तीन बालकांना ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
तिन्ही मुले १६ व १७ वयाची असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे कंपनीचे मालक चैतन्य पाटील (रा. अंत्रोळीकर नगर, सोलापूर) यांच्या विरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील विलास मारुती गायकवाड (वय ५६, रा. वाय चौक, सोनिसिटीच्या मागे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
दुकान निरीक्षक संतोषसिंग ज्ञानोबासिंग राजपूत, लिपिक मनोज राठोड, एमआयडीसी चौकीचे पोलिस अंमलदार आनंदकुमार डौले यांनी ही कारवाई पार पाडली.
0 Comments