सांगोल्यात भुयारी गटारीमुळे पाण्याची पाईपलाईन फुटून मागील चार दिवसापासून पाण्याची गळती सुरू
सांगोला:- अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. रस्ते, पाणी, वाहतूक तसेच अनेकविविध समस्याबाबतीत उपाययोजना केल्या जात आहेत.
सांगोला शहरांमध्ये भुयारी गटारीचे काम मोठ्या गतीने चालू आहे. यामध्ये खोदकाम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटून अनेकदा नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
परंतु वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच भोपळे रोड परिसरात सदरचे खोदकाम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन तुटून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याबाबत नागरिकांमधून तक्रारी प्राप्त होत आहेत.
यावर संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांनी गळती बंद करणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मागील तीन ते चार दिवसापासून पाणी गळतीचा प्रकार सुरू आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी पाण्यातून मार्ग शोधावा लागत आहे. यामुळे पाणी वाहून जाणाऱ्या गटारीचे काम सुरू आहे की तळ्याची कामे चालू आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासंदर्भात संबंधित कर्मचारी यांना सांगितले असता, ते काम आमचे नाही नगरपालिकेचे आहे असे सांगत आहे त्यामुळे रोड वरून ये जा करणाऱ्या नागरिकांना व तेथील शेजारील दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर पाण्याची गळती सुरूच असून याबाबत मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून पाण्याची गळती थांबवावी तसेच संबंधित ठेकेदार यांना सूचना कराव्यात अशी मागणी शहरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.
0 Comments