सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार वृद्धाचा खून करून प्रेत उसाच्या फडात पुरले; आरोपींची कबुली: हत्येमागील धक्कादायक कारण समोर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर:- सोनसाखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे (वय ६८) यांचा खून करून
त्याचा मृतदेह उसाच्या फडात पुरून टाकले होते. याप्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे (रा. बाभूळगाव) व
राहुल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांच्यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे करताच ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१७ फेब्रुवारी रोजी सुरेश शिंदे हे दुपारी ४ वाजता बार्शीवरून बाभूळगावकडे जाण्यासाठी निघाले होते.
मात्र, घरी पोहोचले नव्हते. दि.२० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता बाभूळगाव येथील शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या गट क्रमांक १६५ मध्ये
ऊस लागवडीचे काम सुरू असताना उसाच्या सऱ्यांमध्ये मानवी पाय दिसून आला. बार्शी तालुका पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृतदेह पुरण्यात आला होता आणि दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते. तसेच गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बाभूळगाव व आगळगाव परिसरात तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे सुरेश शिंदे यांच्या शेजारी राहणारी व्यक्ती आणि सालगड्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा अंदाज आला. दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता,
आरोपींनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख रक्कम लुटण्यासाठी त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह उसाच्या शेतात पुरला असल्याचे सांगितले.
दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
दोन्ही संशयितांचा सहभाग सिद्ध झाल्याने दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले
असता सहा दिवस पोलिस कोठडी दिली. तपासी पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयात उभे करताच यावेळी सहायक सरकारी अभियोक्त्ता सोनवणे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.
0 Comments