'ज्या गावात लीड, त्या गावात लावणार तितकीच झाडे',
निवडणुक जिंकताच युवा आमदाराची अनोखी घोषणा; होतंय सर्वत्र कौतुक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या बाबासाहेब देशमुख या युवा नेत्याने पराभव केला आहे.
निवडणुक जिंकताच बाबासाहेब देशमुख यांनी एका अनोख्या उपक्रमाची घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ज्या गावात मतांचा जितका लीड मिळाला आहे, त्या गावात तितकी झाडे लावण्याच्या उपक्रमाची घोषणा बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
महाविकास आघाडीकडून सांगोल्याची जागा शेकाप पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. पण, महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आघाडीत बिघाडी झाल्याने याचा फायदा आमदार शहाजीबापू पाटील यांना होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, जनतेने बाबासाहेब देशमुख यांनाच निवडून दिलं.
बाबासाहेब देशमुख यांना 1 लाख 16 हजार 256, तर त्यांचे विरोधक शहाजीबापू पाटील यांना 90 हजार 870 मते पडली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना 50 हजार 962 मते मिळाली आहेत.
सांगोला शेकापचा बालेकिल्ला
सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. शेकापचे दिवंगत गणपतराव देशमुख यांनी तब्बल 11 वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा हा गड ढासळला. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा
पराभव करुन मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेकापनं आपला या मतदारसंघावर झेंडा फडकावला आहे.
0 Comments