खळबळजनक..माझी आईही तिथे होती… खवळलेल्या CISF च्या महिला जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली
चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील
विजयी उमेदवार कंगना रणौत हिच्या कानशिलात लगावल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली.
आता कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या महिला जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सीआयएसएफच्या महिला जवानाने शेतकरी आंदोलनावरील
कंगना रणौतच्या जुन्या वक्तव्यावरून ती दुखावली गेली असल्याचे म्हटले आहे. आता त्या महिला जवानावर कारवाई करण्यात आली असून तिला निलंबित केले आहे.
कुलविंदर कौर असे त्या महिला जवानाचे नाव आहे. सध्या जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात सीआयएसएफची जवान आपला संताप व्यक्त करत आहे.
‘ही बोलली होती की, 100-100 रुपये घेऊन महिला शेतकरी आंदोलनात बसाल्या आहेत. त्यावेळी त्या आंदोलनात माझी आईही देखिल होती’, असे महिला जवानाने व्हिडिओत म्हटले.
ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. कंगना रणौत विमानतळाच्या सुरक्षा तपासणीतून बाहेर पडत असताना त्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली.
कंगनाला कानशिलात लगावल्याचे कारण शेतकरी आंदोलनाशी जोडलेले आहे. ही संपूर्ण घटना चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 च्या घटनेशी जोडलेली आहे.
शेतकरी आंदोलनाची पोस्टर लेडी म्हणून प्रसिद्ध झालेल्या एका वृद्ध महिलेवर कंगना रणौतने ट्विट केले होते.
तिचे नाव मोहिंदर कौर होते. कमरेला बाक असतानाही शेतकरी आंदोलनात झेंडा उंचावत ती चालत होती. त्यावेळी ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.
काय म्हणाली होती कंगना?
मोहिंदर कौर यांचा फोटो ट्विट करत कंगना रणौतने तिची तुलना शाहीन बागमधील 82 वर्षीय महिला बिल्किस बानोशी करत टीका केली होती.
त्या सीएए विरोधातील आंदोलनात सहभागी होत्या. “हा हा. ही तीच आजी आहे जिचा टाईम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला होता…
आणि या 100 रुपयांना मिळतात”, असे कंगनाने ट्विटमध्ये लिहिले होते. मात्र, नंतर कंगना रणौतने हे ट्विट डिलीट केले होते.
0 Comments