खळबळजनक घटना ...बाबाच्या नादी लागून दोघांनी गमावला जीव, दारू सोडण्यासाठी गेले अन्..
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
दारू सोडण्याचं औषध प्राशन केल्यानं दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील हे सर्व रहिवासी आहेत.
या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या
गुडगाव येथे राहणाऱ्या 2 तरुणांचा दारू सोडण्याचे औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) राहणार गुडगाव अशी मृतकांची नावे आहेत,
तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
गुडगाव येथील चार मद्यपी वर्धा जिल्ह्यातल्या जाम जवळच्या शेडगाव येथे शेळके महाराजांकडे दारू सोडण्यासाठी गेले होते.
महाराजांनी त्यांना दारू सोडण्याची औषधी दिली. त्यानंतर ते आपल्या गावी गुडगाव येथे परत आले.
त्यानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यामध्ये सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
यासंदर्भात व्यसनमुक्ती केंद्रांना समोपदेशन आणि उपचार करणारे डॉक्टर यांनी
अशा प्रकारे महाराज किंवा बाबांच्या आहारी न जाता तज्ञांकडून सल्ला घेणे गरजेचे असून योग्य उपचार करणे गरजेचे आहे असा सल्ला दिला आहे.
0 Comments