सांगोला तालुक्यातील वाळू उपशाला महसूल विभागाची साथ ; मंथलीत अडकले महसूल
प्रशासन तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू : हरिभाऊ पाटील
सांगोला :- तालुक्यातून दररोज हजारो ब्रास खुलेआम वाळूचा उपसा होत आहे. अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध असताना
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक जोरात सुरु आहे.
संबंधित तलाठी, मंडल अधिकारी यांचा ही यामध्ये खारीचा वाटा असतो. वाळू व्यावसायिकांनी 'मंथली' द्या आणि कितीही वाळू उपसा करा,
असा फतवा काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काढल्याची चर्चा आहे. यामुळेच तालुक्यात महसूल विभागाच्या आशीर्वादाने दररोज हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे.
तालुक्यातील अवैद्य वाळू उपसा बंद करावा अन्यथा महसूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे नेते हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे.
अनाधिकृत वाळू उपसा व बेकायदेशीर वाहतुकीबाबत नुकतीच पार पडलेली सांगोल्याची आमसभा मोठ्या प्रमाणात गाजली होती.
यामध्ये मध्यंतरी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी वाळू माफिया यांचा वाढदिवस साजरा केला
याबाबत ही सोशल मीडियावरून प्रशासनाची नाचक्की झाली होती. यासह वेगवेगळ्या माध्यमातून अवैद्य वाळू उपसा हा विषय गाजत असताना प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने,
सांगोला तालुक्यात वाळू उपसा जोमात सुरू आहे. महसूल प्रशासनाचा आशीर्वाद असल्याने वाळू माफिया नद्या नाले ओढे ओरबडून काढत आहेत.
तालुक्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट असताना, नदीपात्रातील वाळू उपसा बंद होताना दिसत नाही. वाळू उपसा बंद करणे यामध्ये संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे.
याबाबत तालुक्यातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली उपोषण केले तरी देखील प्रशासन गांभीर्याने घेत नाही. यावरून तालुक्यात संतापाची लाट सुरू आहे.
तालुक्यातून होत असलेल्या वाळू वाहतुकीची 'मंथली' गोळा करण्यासाठी महसूल कर्मचारी कार्यरत आहेत.
तर त्यांच्या समवेत झिरो कर्मचारी मदत करीत असल्याने लाखो रुपयांची 'मंथली' वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या खिशात जाते.
तहसील कार्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवून वाहने पास करण्यासाठी काही युवक काम करीत असल्याने त्यांना ही या धंद्यातून चांगलाच मोबदला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
वाळू उपशाला महसूल विभागाची साथ मिळत असल्याने या विभागाने वाळू उपशासाठी वाहनांचे दरपत्रक तयार केले आहे. ट्रक, ट्रॅक्टर व डंपरसाठी वेगवेगळे दर तयार करण्यात आले आहेत.
त्यातून दरमहा लाखो रुपयांचा मलिदा या वाळू व्यावसायिकांकडून महसूल विभागाला मिळत असल्यानेच वाळूचे दर कडाडल्याचे चित्र आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार व महसूल चे अधिकारी मंथलीमध्ये अडकले असून महसूल च्या कृपाशीर्वादाने वाळू माफिया मस्तावला आहे. यावर प्रशासनाने तातडीने निर्बंध ला घालावेत
आणि सांगोला तालुक्यातील वाळू उपसा बंद करावा अन्यथा, संबंधित प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे नेते हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे.
0 Comments