रक्ताच्या थारोळ्यातील वडिलांना उठवण्याचा चिमुरड्याचा प्रयत्न अयशस्वी; सांगोला-मिरज महामार्गावर भीषण अपघात
सांगोला : उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी वडिलांबरोबर गावी आल्यानंतर पुन्हा सुट्टी संपवून वडिलांबरोबर कारने बंगळुरूकडे निघालेल्या अकरा वर्षीय चिमुकल्याला वडिलांचा मृत्यू डोळ्यांसमोर पहावा लागला.
सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी गावाजवळ मालट्रक व कारच्या अपघातात कार चक्काचूर झाली. यामध्ये सराफ व्यावसायिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील रानंद (ता.माण) येथील सतीश रामहरी कदम
(वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा वरद सतीश कदम हा सीट बेल्ट लावून बाजूच्या सीटवर झोपल्याने तो वाचला.
वडिलांना उठवण्याचा प्रयत्न
या भीषण अपघातामुळे झालेल्या आवाजाने जागा झालेल्या वरदने गंभीर जखमी झालेल्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला.
दुर्दैवाने या अपघातात सतीश कदम गंभीर जखमी होऊन गतप्राण झाले होते. अंधारामध्ये त्याने वडिलांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हलले नाहीत.
सुदैवाने वडिलांचा मोबाईल त्याच्या जवळ असल्याने, बंगळुरूला असलेल्या आईला फोन करून त्याने आपल्या कारचा अपघात झाला असून, पप्पा उठत नसल्याचे सांगितले.
दीर उमेश कदम यांना फोन करून घटनेची माहिती
यानंतर त्याच्या आईने गावी असलेले त्यांचे दीर उमेश कदम यांना फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी उमेश कदम यांनी अकलूजमधील त्यांचे मेहुणे प्रा.गोडसे यांना फोन करून हा प्रकार सांगितला.
सुदैवाने त्यांचे मेहुणे प्रा. गोडसे यांचे मित्र त्या परिसरात असल्याने काही वेळानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
हृदय हेलवणारी घटनेने परिसरात शोककळा
यादरम्यान अपघात स्ळी असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर भेदरलेल्या वरदला कारच्या बाहेर काढून त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेले.
हृदय हेलवणारी ही घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी गावाजवळ घडली. या घटनेमुळे रानंद गावावर शोककळा पसरली आहे.
सतीश कदम हे सराफ व्यावसायिक असून ते मूळचे रानंद या गावचे रहिवासी आहेत. बंगळुरू या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून ते सराफ व्यवसाय करीत आहेत.
मुलगा वरदला घेऊन निघाले होते बंगळुरूला
आपल्या कुटुंबीयांसह मुलगा वरदला घेऊन काही दिवसांपूर्वी आपल्या रानंद या गावी आले होते.
सोमवारी रात्री ते मुलगा वरद याला घेऊन आपल्या इनोव्हा कारने (क्र. एम. एच. १२ / एस. यू. ३२३३) मधून पंढरपूर, विजापूर मार्गे बंगळुरूला निघाले होते.
मध्यरात्री ते पंढरपुरात आल्यावर त्यांचा रस्ता चुकला आणि ते विजापूर रोडने न जाता सरळ सांगोला मार्गे नागजकडे निघाले होते.
वाटेत सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी गावाजवळ त्यांची कार पाठीमागून समोरील मालट्रकवर जोरात आदळली.
या अपघातात सतीश कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच मरण पावले तर त्यांच्या शेजारी डाव्या सीटवर बसलेला मुलगा वरद जखमी झाला.
मुलगा वरदने सीट बेल्ट लावल्याने बचावला
प्रवासादरम्यान सतीशने वरद यास शेजारच्या सीटवर बेल्ट लावून झोपण्यास सांगितले होते, सुदैवाने सीट खाली घेऊन वरद मोबाईल बघत झोपी गेला होता.
या दरम्यान मालट्रकला कार धडकली. या अपघातात सतीश कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच गतप्राण झाले.
यावेळी अचानक काहीतरी धडकल्याचा आवाज आल्याने वरद झोपेतून जागा झाला, तोच वडील कारमध्ये जखमी अवस्थेत दिसले. त्याने वडिलांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला.
मात्र सतीश कदम गतप्राण झाले असल्याने त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यानेच धाडसाने कारमधून बाहेर पडत आईला अपघाताची माहिती दिली.
दरम्यान, उपस्थित नागरिकांनी हृदय हेलावणारा हा प्रकार पाहिल्यानंतर वरदला धीर देत त्याच्याकडील मोबाईल वरून कदम यांच्या नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली.
दरम्यान काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सतीश यांच्या आई, पत्नी, मुलगा वरद व दोन मुली, विवाहित भाऊ असा परिवार आहे.
0 Comments