लोकसभेच्या उमेदवाराला ९५ लाखांपर्यंतच खर्चाचे बंधन! केवळ ५०००० ठेवा जवळ;
प्रचारासाठी मिळणार १३ दिवस, जाणून घ्या अर्ज भरणे अन् माघार घेण्याची मुदत
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. उमेदवारांना निवडणूक काळातील खर्चाचा हिशेब जिल्हा प्रशासनाला द्यावा लागणार आहे.
दुसरीकडे निवडणूक काळात उमेदवाराकडे ५० हजारांपर्यंतच रक्कम जवळ बाळगता येईल, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक काळात मतदारांना पैसे दिल्याच्या तक्रारी येतात. वाहनातून पैसे ने-आण केल्याचेही आरोप होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली पथके संशयास्पद वाहनांची तपासणी नियमितपणे करतील.
एखाद्या वाहनात १० लाखांपर्यंत रक्कम आढळल्यास त्याची चौकशी होईल. पण, तेवढी रक्कम वाहून नेताना त्या वाहनातील व्यक्तीकडे त्या पैशासंदर्भातील कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत.
दहा लाखांहून अधिक रक्कम आढळल्यास त्याची शहानिशा पोलिसांमार्फत होईल. तसेच त्या रकमेची माहिती आयकर विभागाला कळविली आहे का, यासंदर्भात देखील खात्री केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम असा...
उमेदवारी अर्ज भरणे
१२ ते १९ एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी
२० एप्रिल
उमेदवारी अर्ज माघार
२२ एप्रिल
मतदान
७ मे
मतमोजणी
४ जून
उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार १३ दिवस
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार
असून २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरल्यापासून २३ दिवस तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपासून अवघे १३ दिवस प्रचारासाठी वेळ मिळणार आहे.
-----------------------------------------------------------
पहिला अर्ज केलेल्यांनाच सभेसाठी मैदान
राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांसाठी मैदाने उपलब्ध करून दिली जातील, पण त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू केली असून मैदानांच्या उपलब्धतेसाठी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.
ज्यांचा पहिला अर्ज येईल, त्यांनाच ते मैदान सभेसाठी दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
----------------------------------------------------------
प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १६६ पथके
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ४८ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, ४६ फ्लाईंग स्कॉड, ४८ व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, १३ पथके
निवडणुकीतील प्रचार सभांचे व्हिडिओ तपासणीसाठी व ११ पथके आर्थिक बाबींच्या पडताळणीसाठी नेमली आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांना १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.
--------------------------------------------------------------
८२ हजार मतदारांना घरबसल्या मतदानाची सोय
जिल्ह्यातील ८५ वर्षांवरील ५४ हजार ९९१ तर २७ हजार १९४ दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. ज्यांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येणार नाही, त्यांना घरी बसून मतदान करता येईल.
त्यासाठी १२ ते १७ एप्रिल या काळात या मतदारांकडून अर्ज भरून घेतले जातील. ज्यांनी घरी बसून मतदान करणार हा पर्याय निवडला, त्यांचे मतदान पाच अधिकारी पाठवून त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे.
--------------------------------------------------------------
अर्ज भरताना तीन वाहने, पाच व्यक्तींनाच परवानगी
उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवारासोबत तीन वाहने व पाच व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.
त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयातच करून दिली जाणार आहे.
0 Comments