खळबळजनक घटना...अभयने आपल्या 6 वर्षांच्या गोंडस
लेकीला का मारलं? धक्कादायक कारण समोर
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे, अवघ्या राज्याला हादरावून सोडणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. एका 6 वर्षांच्या चिमुरडीचा खून करून बापाने आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जन्मदात्या पित्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागातील एका 35 वर्षे वयाच्या वडिलाने आपल्या 6 वर्षे वयाच्या मुलीस बेडशीटने गळफास देऊन तिला ठार केले
आणि नंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली होती. अभय भुतडा असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
अभयने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं?
मयत अभय भुतडा यांचा व्यवसायात जम बसावा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि सासरच्या लोकांनी देखील वेळोवेळी मदत केली होती. दरम्यान त्यांनी अनेक व्यवसाय करून पाहिले.
पण त्यात त्यांना अपयश आलं. सध्या मार्केट यार्ड परिसरात त्यांनी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. अलीकडे ते कर्जबाजारी झाल्याचे देखील समोर आले होते.
गेल्या सहा महिन्यांपासून ते आर्थिक विवंचनेत होते, असं नातेवाईकानी सांगितलं. त्यामुळेच कर्जबाजारी पणाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या मुलीसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नातेवाईकानी पोलिसांना दिली.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मार्केट यार्डाच्या दक्षिण गेटच्या समोर भुतडा कुटुंबीय राहतं. त्यांचं याच परिसरात कोरे गार्डनसमोर इडली गृह आहे.
अभय लखन भुतडा (वय 35) हा इडली गृहातून जवळच असलेल्या घरी आला. मुलीला इडली देतो आणि शाळेत नेऊन सोडतो असं कारण त्यानं सांगितलं. घरी आल्यानंतर त्याच्या मनात कोणता राग होता,
काय कारण होते माहिती नाही. पण, आपल्या पोटच्या सहा वर्षे वयाच्या मुलीस अगोदर गळफास देऊन तिला ठार केलं आणि स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.
भुतडा परिवार मोठा असून त्यांची या परिसरात मोठी इमारत आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.
पोलिसांनी या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेच्या वेळी अभय भुतडा यांची पत्नी याच परिसरात असलेल्या माहेरी गेली होती.
पण घरी परत येईपर्यंत दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
0 Comments