google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील निवडणुकीत शेकापच्या वर्चस्वामुळे आजी - माजी आमदारांना आत्मचिंतनाची वेळ

Breaking News

सांगोला तालुक्यातील निवडणुकीत शेकापच्या वर्चस्वामुळे आजी - माजी आमदारांना आत्मचिंतनाची वेळ

 सांगोला तालुक्यातील निवडणुकीत शेकापच्या वर्चस्वामुळे आजी - माजी आमदारांना आत्मचिंतनाची वेळ


सांगोला : सांगोला तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शेकापने तीन ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. या तीन ग्रामपंचायतीमध्ये आमदार शहाजी पाटील यांच्या खावासपूर ग्रामपंचायत व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे वर्चस्व असलेले वाढेगाव ग्रामपंचायतीवर सत्तांतर होवून शेकापने सत्ता मिळवल्याने आजी-माजी आमदारांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

तालुक्यात चारच ग्रामपंचायतींची निवडणूक असली तरी आमदार शहाजी पाटील यांच्या महूद या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार शहाजी पाटील यांची स्वतःचे गाव असल्यामुळे या ग्रामपंचायतीवर जास्त लक्ष दिल्याचे दिसून आले.

आमदार शहाजी पाटील यांच्या गावामध्येच उद्धव ठाकरेच्या युवा सेनेने दंड थोपटून चांगलीच लढत दिल्याची दिसून आले. 

खवासपूर ही ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षापासून आमदार शहाजी पाटील यांच्या गटाकडे होती. या गावांमध्ये आ. शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील गटामध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापले होते.

शेवटच्या टप्प्यामध्ये साळुंखे-पाटील यांच्या राष्ट्रवादीने सर्व अर्ज माघारी घेऊन शेकाप पक्षाला ताकद दिल्याचे दिसून आले. 

त्यामुळे आमदार पाटील यांची सत्ता असलेले ग्रामपंचायतवर शेकाप पक्षाने वर्चस्व मिळविले. वाढेगाव या ग्रामपंचायतीवर माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची सत्ता होती.

परंतु या गावांमध्येही आजी - माजी आमदाराचा मेळ लागलेला दिसून आला नाही. या ग्रामपंचायतीवरही सत्ताबदल होऊन शेकापने आपला झेंडा रोवला. सावे या गावी गेल्या अनेक वर्षापासून शेकापचेच प्राबल्य आहे.

 तेथे शेकापच्याच दोन गटांमध्ये लढत झाली. परंतु येथे शेकापला दोन्ही गटाचा मेळ घालता मात्र आला नाही. आपल्याच पक्षात फुट पडल्याची या गावी दिसून आली.

कार्यकर्त्यांच्या जिरवा - जिरवीमध्ये आजी-माजी आमदाराला फटका -

या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील एकत्रित लढण्याचे अनेक ठिकाणी दिसून आले नाही. खवासपूर व वाढेगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे.

या दोन्ही ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने मिळवलेले वर्चस्व वाखाण्यजोगे आहे. खवासपूर येथे जागा वाटपावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे घेतले असले 

तरी त्यांनी थेटपणे आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात भूमिका घेऊन शेकाप पक्षालाच मदत केल्याची दिसून आले. तर वाढेगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार शहाजी पाटील यांच्या काही समर्थकांनी थेट शेकापच्या हातात हात घालून निवडणूक लढवली.

कार्यकर्त्यांच्या मतभेद मिटविण्यात आजी - माजी आमदारांना अपयश

तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झालेले दिसून आले. या मतभेदाचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला जरी झाला असला 

तरी हे मतभेद मिटवून एकत्रित राहण्यास, कार्यकर्त्यांना शांत करण्यास आजी-माजी आमदारांना अपयशच आले आहे. आजी-माजी आमदारांनी याबाबत वेळीच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे हे निकालावरून स्पष्ट झाले.

डॉ. बाबासाहेब देशमुखांची यशस्वी रणनीती -

स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाला नेतृत्वाचा अभाव होता. परंतु डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा मेळ घालत या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळवलेले

 यश पक्षाला उभारी देणारे ठरले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे निवडणुकीतील शांतपणे केलेली रणनीती शेकाप पक्षाच्यां वर्चस्वाला कारणीभूत ठरली आहे.

- निवडणुकीतून शेकापचे वर्चस्व सिद्ध

- आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते दुरावल्याचा फटका

- शेकापमध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे नेतृत्व सिद्ध

- आमदार शहाजी पाटलांना स्वतःची ग्रामपंचायत राखता आली

- शेकापच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

Post a Comment

0 Comments