ब्रेकिंग न्यूज ! शरद कोळींमुळे ठाकरे गटाला तगडा झटका
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षाच्या बांधणीसाठी मोठे फेरबदल करताना दिसत आहेत.
नुकताच त्यांनी पक्षाच्या ठाकरे गटाच्या उपनेतेपदी सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांची नियुक्ती केली.
मात्र त्यांच्या या निर्णयाला स्थानिक निष्ठावंत बड्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी अमान्य केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
उद्धव यांनी कोळींना उपनेतेपद देताच पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी कोळी यांच्यावर गंभीर आरोप करत
थेट पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद कोळी यांना राजकारणाचा अनुभव नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोळी यांनी ठाकरे गटात जाऊन प्रथमच राजकारणात पदार्पण केले.
त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याने वादग्रस्त आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीच्या विरोधात सातत्याने आवाज उठविताना त्यांनी काही वेळा संकट ओढवून घेतले आहेत.
धाडस नावाच्या संघटनेच्या माध्यमातून वाळू तस्करांच्या विरोधात लढा देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने कोळी यांना काही वर्षे सशस्त्र पोलीस संरक्षणही देण्यात आले होते.
पोलीस संरक्षण असताना कोळी यांच्यावर खंडणी मागणीचे गुन्हे दाखल झाले होते.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कोळी यांना लगेचच पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले. त्यानंतर नुकतेच त्यांना उपनेते पदावर बढती मिळाली. परंतु या बढतीला अभंगराव यांनी जोरदार विरोध
दर्शवित थेट पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची भूमिका जाहीर केली आहे. अभंगराव हे शिवसेनेत ४० वर्षांपासून कार्यरत आहेत.
शरद कोळी हे उपनेते म्हणून आपण सहन करणार नाही, सध्या मातोश्रीवर चालले तरी काय?, असा सवाल अभंगराव यांनी केला आहे.


0 Comments