सांगोला तालुका शेतकरी शिक्षण संस्थेस उच्च न्यायालयाचा दणका..!!
सचिव आणि प्राचार्यांच्या मनमानी कारभारामुळे संस्थेला बसणार कोट्यावधींचा भुर्दंड...?
सांगोला : प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक क्षेत्रात नावाजलेली आणि स्व. डॉ. भाई गणपतराव देशमुख अध्यक्ष असलेल्या सांगोला शहरातील सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक संस्थेस महाविद्यालयातील ग्रंथपाल शरणप्पा हेगडे यांनी केलेल्या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
शरणाप्पा हेगडे यांना कामावरून कमी केल्याचा आदेश रद्दबातल ठरवत त्यांना तातडीने सेवेत रुजू करून घेण्याचा आदेश दिला आहे.
तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे २९ सप्टे २००० पासून त्यांचे फरकासह देय रक्कम दोन महिन्याच्या आत शरणाप्पा हेगडे यांना देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संस्थेला कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड बसणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. संस्थेच्या दोन्ही शाखेमध्ये सचिवांचा नाहक हस्तक्षेप असून ते शाखाप्रमुखांच्या कार्यात बाधा निर्माण करत असतात.
त्यांच्या या मनमानीपणामुळे अनेक सेवकांच्या बढत्या वेतनवाढ रोखून धरल्या आहेत. तसेच महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कायदा २०१६ नुसार महाविद्यालयाचा कारभार चालतो त्यास छेद देऊन सचिव यांनी प्रभारी प्राचार्य करवी
विद्यापीठास चुकीचा पत्रव्यवहार करून त्यावर स्वतःची सही करून महाविद्यालय विकास समिती गठीत केली. समिती गठित करीत असताना शासनाचे निकष बाजूला ठेवून स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींची नावे या समितीत समाविष्ट केली.
ही समिती विद्यापीठात पाठवली या बेकायदेशीर कृतीविरुद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे रीतसर तक्रार केली असता, विद्यापीठाने त्यावर सत्यशोधन समिती नेमली.
सदर समितीने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कायदा २०१६ चे उल्लंघन केल्याबद्दल सचिव व प्राचार्य यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यावेळेस चुका सुधारून घेण्याची व माफी मागण्याची नामुष्की सचिव आणि प्रभारी प्राचार्य यांच्यावर ओढावली होती.
दरम्यान शारणाप्पा हेगडे यांच्या प्रकरणामुळे महाविद्यालयात सचिव आणि प्रभारी प्राचार्य कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची गळचेपी करतात हेच समोर आले आहे.
हेगडे यांच्याप्रमाणे अनेक कर्मचारी सचिव आणि प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. लवकरच अजून काही कर्मचारी संस्था सचिव आणि प्राचार्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड कुणावर…?
शरणापपा हेगडे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हेगडे यांना २९ सप्टेंबर २००० पासून फरकसह देय रक्कम दोन महिन्याच्या आत देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ही रक्कम काही कोटीच्या घरात जाते. संस्था सचिव आणि प्राचार्य यांनी केलेल्या चुकांचा हा भुर्दंड संस्था भरणार का…? याबाबत ही संस्थेच्या सभासदामध्ये चर्चा सुरू आहे.
संस्थेवर प्रशासक नेमण्याच्या मागणीला जोर
स्व. भाई गणपतराव देशमुख अध्यक्ष असलेल्या सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत सध्या सचिव प्राचार्य तसेच काही संचालक मंडळी मनमानी कारभार करत आहेत. या संस्थेत त्यांनी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे.
त्यामुळे कधीकाळी शिक्षण क्षेत्रात अव्वल स्थानावर असलेली ही संस्था बदनाम होऊ लागली आहे. संस्थेत पारदर्शक कारभार होत नसल्याने संस्थेतील कर्मचारीच संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी करू लागले आहेत.
0 Comments