सोलापूर विमाधारक शेतकऱ्यांना महिन्यात खरिपाची 25 टक्के भरपाई
द्यावी; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे विमा कंपनीला आदेश
सलग एकवीस दिवस पावसात खंड पडल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्याबाबतचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला.
अहवालानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ७४ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यात एकूण ११० महसूल मंडल आहेत.
यापैकी ९१ मंडलात हवामान केंद्र संबंधित यंत्रणा कार्यरत आहे. पैकी ७४ मंडलाचा अहवाल बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला.
कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने यांच्या सूचनेनुसार ७४ मंडलात तातडीने पंचवीस टक्के विमा रक्कम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही गुरुवारपासून करावी, अशी अधिसूचना
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बुधवारी काढली. विमा कंपन्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
कृषी विभागाकडे प्रस्ताव
उर्वरित १७ मंडलात काही प्रमाणात पाऊस झाला असून, या मंडलाचा प्रस्ताव कृषी विभागाच्या अपर सचिव यांच्याकडे पाठवला आहे.
या मंडलातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात यावी, अशा मागणीचा प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे.


0 Comments