ब्रेकिंग न्यूज..रणजितसिंह निंबाळकरांचा माढ्यावर पुन्हा नेम; भाजपातच उमेदवारीसाठी रस्सीखेच
खासदार निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध तालुक्यासाठी पाण्यासाठी उठवलेला आवाज, हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी पवारांचाही मोठा रोष पत्करला होता.
सांगोला - लोकसभेच्या निडणूका जवळ येऊ लागताच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पुन्हा एकदा माढ्यावर नेम धरला आहे. उमेदवारीच्या रस्सीखेचमध्ये मोहिते पाटील घड्याळाकडे बघत वेळेच्या संधीची वाट पाहत आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
माढा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत 2009 ला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केल्याने प्रथमपासून हा मतदार संघ संपूर्ण देशात ओळखला जाऊ लागला होता. 2014 ला मोदींची लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटलांनी हा मतदारसंघ खेचून आणला होता.
परंतु 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या माळशिरसने एक लाखाच्या लीडवर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात निंबाळकराच्या माध्यमातून कमळ फुलले होते. नव्याने खासदार झालेले रणजितसिंह निंबाळकर यांनी सुरुवातीला सर्वच तालुक्यात मोठा जनसंपर्क ठेवला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात त्यांचा जनसंपर्क कमी झाला होता.
आता निवडणीकीच्या उंबरठ्यावर खासदार निंबाळकर यांनी माढ्यात आपली स्वतःची यंत्रणा सर्व तालुक्यात कामाला लावल्याचे दिसून येत आहे. खासदार निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध तालुक्यासाठी पाण्यासाठी उठवलेला आवाज, हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी पवारांचाही मोठा रोष पत्करला होता. किसान रेल्वेच्या माध्यमातून केलेले प्रयत्न त्यांच्या बाबतीत आशादायक चित्र आहे.
माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. खासदार निंबाळकर केंद्रात पवारांना थेट टक्कर देणारा नेता अशी ओळख निर्माण केली होती. यामुळे त्यांना केंद्रीय गृह, टेलिफोन, रेल्वे आणि अन्य महत्त्वाच्या समित्यावर काम करण्याची संधी मिळाली.
याच माध्यमातून त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधली. तसेच राज्यातील भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले. मोहिते पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.
उलट मोहिते पाटील समर्थकांकडून धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो लावून ‘आमचं ठरलंय...खासदारकीचं’ म्हणत सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल केल्या आहेत. अशा राजकीय परिस्थितीत सांगोल्यातील कार्यक्रमासाठी आल्यानंतर खुद्द शरद पवार यांनी मोहिते पाटलांच्या 'शिवरत्न'वर भेट दिल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत.
सध्या परिस्थितीत खासदार निंबाळकर यांचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत असलेले जवळचे संबंध, मतदार संघातील नव्या राजकीय घडामोडीमुळे शिंदे बंधूंचा झालेला नवा दोस्ताना, पाण्यासाठी केलेली राजकीय लढाई यामुळे निंबाळकरांचे पारडे भाजपात जडच वाटत आहे.
भाजप विरोधक उमेदवार कोण ?
सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडीमुळे मतदारसंघातील जवळजवळ सर्वच आमदार भाजपजवळ एका रेषेत आलेले दिसून येत आहेत. 2019 ला राष्ट्रवादी पुरस्कृत विरोधात निवडणूक लढवलेले आमदार संजय शिंदे तसेच आमदार बबनदादा शिंदे हे निंबाळकर - मोहिते पाटीलांतील सख्य पाहता सध्या खासदार निंबाळकरांना लाखांचे लीड देण्याची भाषा बोलू लागले आहेत.
मोहिते पाटलांची भाजपमधील शांतताच विरोधकांना आपलीशी वाटत आहे. परंतु विरोधकांमध्ये सध्या तरी माढा काबीज करणारा दिग्गज नेता दिसून येत नाही. निवडणुकीच्या वेळेची राजकीय परिस्थिती व रुसवे फुगव्यातूनच विरोधी उमेदवार ठरला जाईल असे वाटत आहे.


0 Comments