google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात भाजपला धक्का; जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Breaking News

सोलापुरात भाजपला धक्का; जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 सोलापुरात भाजपला धक्का;


जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारतीय जनता पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षांसह त्यांच्या समर्थकांनी आज (ता. १४ ऑगस्ट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सोलापूरचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र शहाजीराव पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ हाती बांधले आहे. पाटील यांच्यासोबत भाजपचे तब्बल १०० कार्यकर्तेही राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. 

बारामती येथील गोविंद बागेत पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या वेळी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गोविंद बाग येथे झालेल्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा हा काँग्रेसच्या विचाराचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ दिली. 

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढली होती. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी बळकट होण्याची परिस्थिती आहे. निष्ठावान लोकांचीही संघटनेला गरज असते, असेही पवार यांनी नमूद केले.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीवरही पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, विजयसिंह मोहिते पाटील हे आजारी होते; म्हणून मी माणुसकीच्या भावनेतून भेटायला गेलो. सोलापूरचे लोक अनेक दिवसांपासून मला बोलवत होते. तयारी करून जावं म्हटलं. सोलापूरमध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला, असेही पवारांनी आवर्जून सांगितले.

आठवलेंना पंढरपूरमध्ये कोणीही ओळखत नव्हते

पंढरपूरमध्ये आम्ही रामदास आठवले यांना उभे केले. त्यावेळी रामदास आठवले यांना पंढरपूर माहितही नव्हते. तसेच पंढरपूरमधील लोकांनाही आठवले माहिती नव्हते. तरीही लोकांनी साथ दिली, असेही पवार यांनी सांगितले.

देशाच्या ७० टक्के भागात भाजप नाही

भारताचा नकाशा नजरेसमोर ठेवा. त्यात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये तुम्हाला भाजप दिसणार नाही. देशाच्या ७० टक्के भागात भाजप नाही, असा दावाही शरद पवार यांनी केला.

Post a Comment

0 Comments