भयंकर घटना ...अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक;
अग्निशामक दल कर्मचाऱ्याच्या शरीराच्या अर्ध्या भागाचा चेंदामेंदा
कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे मंगळवारी (ता. ८) रात्री भरधाव वेगात जाणार्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने जागी ठार झाला.
अपघात एवढा भयंकर होता की, अज्ञात वाहनाने मृत व्यक्तीला लांबपर्यंत ओढत नेल्याने शरीराच्या अर्ध्या भागाचा चेंदामेंदा झाला होता, तर दुचाकीने पेट घेतला. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून, आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कुरकंभ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर हॉटेल फौजी समोरील रस्ता ओलांडण्यासाठी ठेवलेल्या दुभाजकाच्या ठिकाणी भरधाव जाणार्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने अपघातात दुचाकी (एमएच.१४, ईई. १७२७) वरील सुनील पुराणे (वय ३५, रा. कुरकुंभ औद्योगिक अग्निशामक वसाहत, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले.
अपघातातील पुराणे यांचा मृतदेह अज्ञात वाहनाने लांब अंतरापर्यंत ओढत नेल्याने शरीराच्या अर्ध्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. तर रस्त्यावर घासत केल्याने घर्षणाने दुचाकीने पेट घेतला होता. यावरून अपघात किती भयंकर असल्याचे लक्षात येते. शरीराचा चेंदामेंदा झाल्याने लगेच मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती.
मात्र रात्री उशिरा सदर मृत व्यक्ती औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक विभागातील कर्मचारी सुनील पुराणे असल्याची ओळख पटली. सदर अपघाताच्या ठिकाणी दुभाजक असल्याने येथे वाहने, प्रवाशी, ग्रामस्थ व जनावरे रस्ता ओलंडतात. याठिकाणी पुणे बाजूकडून येणार्या रस्त्याला उड्डाण पुलाचा उतार असल्याने वाहने वेगात असतात.
अचानक रस्ता ओलंडताना वाहने किंवा व्यक्ती समोर आल्यास वाहनचालकाच्या लक्षात येत नसल्याने अपघात होतात. त्यामुळे सदर ठिकाण अत्यंत धोकादायक बनले आहे.
त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून, यापूर्वी या ठिकाणी अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


0 Comments