मोठी बातमी..मोहिमेत सांगोला तालुक्यातील दोघांचा समावेश; सांगोलाकरांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव सांगोल्यातील असणारे
अनंत पत्की हे 'इस्रो'मधून वरिष्ठ सायंटिस्ट म्हणून निवृत्त झाले आहेत.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क संपादक संतोष साठे)
सांगोला - 'चांद्रयान-3' ही महत्त्वकांक्षी मोहिम यशस्वी झाल्याने जगभरातून भारताचे कौतुक होत आहे. या मोहिमेमध्ये सांगोल्यातील दोघांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभाग असल्याने या मोहिमेत सांगोल्याचा खारीचा वाटा निश्चितपणे आहे.
सांगोल्यातील तनुजा पत्की या बंगलोरच्या उपग्रह केंद्रात वरिष्ठ इंजिनीयर व या मोहिमेतील मिशनच्या सदस्य आहेत.
तर दुसरे तालुक्यातील खवासापूर येथील चंद्रशेखर भोसले या उद्योजकाने 'चांद्रयानात-3' साठी वापरलेल्या सिल्वर आणि कॉपरपासून तयार केलेल्या ट्यूब बनवून दिल्या होत्या. या दोघां सांगोलाकरांवर सध्या सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
'चांद्रयान-3' मोहीम यशस्वी करीतं इसरोच्या शास्त्रज्ञांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. संपूर्ण जगाने भारताचे या कामगिरीचे कौतुक केले आहे. या मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील दोघा जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे.
सांगोल्यातील असणारे अनंत पत्की हे 'इस्रो'मधून वरिष्ठ सायंटिस्ट म्हणून निवृत्त झाले आहेत.
अनंत पत्की यांच्या सुनबाई तनुजा पतकी या सध्या बंगलोरच्या उपग्रह केंद्रात वरिष्ठ इंजीनियर आहेत. व त्या मोहिमेतील मिशन टीमच्या सदस्य आहेत.
त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून गेली 18 वर्षे इस्रोत कार्यरत आहेत.
उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्याचा मार्ग, स्थिती व दिशा नियंत्रित ठेवावी लागते. त्यासाठी विविध सेन्सर्स कडून डेटा गोळा करत उपग्रहाला पूर्व नियोजित स्थितीत आणण्याचे काम तनुजा यांच्या टीमकडे आहे.
तनुजा यांचे पती अभिजीत पत्की हे आयआयटी मुंबईत शिकले असून इलेक्ट्रॉनिक्स चिप डिझाईनमध्ये काम करतात.
अनंत पत्की यांचे शिक्षण सांगोला, सोलापूर, सांगली व बंगलोर येथे झाले. त्यांनी स्वतः डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बरोबर काम केले होते.
त्यांचा भारताचा प्रथम उपग्रह 'आर्यभट्ट'मध्ये महत्त्वाचा सहभाग होता. ते सध्या पुणे येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांच्या सुनाबाईनेही 'इस्रो'मध्ये आपले नाव कमावले आहे.
'चांद्रयान-3' मोहिमेत दुसरे अप्रत्यक्षरीत्या सहभाग असलेले तालुक्यातील खवासापूर येथील चंद्रशेखर भोसले या उद्योजकाने 'चांद्रयानात - 3'साठी वापरलेल्या सिल्वर आणि कॉपरपासून तयार केलेल्या ट्यूब बनवून दिल्या होत्या.
यामुळे चांद्रयानाचे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. या ट्यूबमुळेच चांद्रयानाला वेळोवेळी देण्यात आलेले सिग्नल देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाली आहे.
अत्यंत गरीब परस्थिती मधून आलेल्या चंद्रशेखर भोसले यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगोला येथे पूर्ण केले. चंद्रशेखर भोसले यांचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चांदीपासून इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्याचा व्यवसाय आहे.
गेल्या 11 वर्षांपासून ते इस्त्रोला चांदी आणि कॉपर पासून बनवलेली विविध उपकरणे पुरवतात.
चांद्रयान मोहिमेत देखील कॉपर आणि चांदी पासून बनवलेल्या 50 ट्यूब तयार करून त्या इस्त्रोला दिल्या आहेत. त्या सर्व ट्यूबचा वापर चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे.
चंद्रशेखर भोसले यांचे आई-वडील आणि बंधू खवासपूर गावात शेती करतात. सध्या चांद्रयान मोहिमेतील प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी असणारे या सांगोलकरांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
'इस्रो'मध्ये मीही शास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. आज माझी सूनबाईही त्या ठिकाणी काम करीत आहे.
चांद्रयान मोहीम यशस्वी झाले हा खरोखरच आपल्याला गौरवाचा क्षण आहे. या मोहिमेत माझी सुनबाई सहभागीही आहे यात मला खूप अभिमान वाटत आहे.
- अनंत पत्की, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ, इस्रो.
सांगोला सारख्या दुष्काळी भागामधून 'इस्रो'सारख्या मोठ्या संशोधन केंद्रामध्ये आज सांगोलकर प्रत्यक्ष काम करीत आहेत.
'चांद्रयान - 3' या मोहिमेमध्ये आपल्या सांगोलकरांचा सहभाग आहे हा खरोखरच अभिमानास्पद व कौतुककास्पद गोष्ट आहे.
- अनिरुद्ध पुजारी, सांगोला.
0 Comments