राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यासपीठावर असलेल्या फडणवीसांना सांगितले सांगोल्याचे 'राज'कारण, म्हणाले...
एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे.
याचवेळी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले.
त्यामुळे हे दोन नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले होते. या कार्यक्रमात सांगोलेकरांनी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष सोडला तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाला स्वीकारलेले नाही असे सांगत शरद पवारांनी स्टेजवर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच इशारा दिला आहे.
शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण सांगोल्यात झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रविवारी एकाच मंचावर आले. यावेळी पवारांनी आपल्या भाषणात गणपतरावांच्या आठवणींना उजाळा दिला.
पवार म्हणाले, पवार म्हणाले, मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो, सांगोला हा एकच मतदारसंघ असा आहे, एक काँग्रेस आणि दुसरा शेतकरी कामगार पक्ष जर सोडला तर दुसरा कुठलाच पक्ष सांगोलेकरांनी स्वीकारला नाही.
हे या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. एकदा एका रस्त्याने जायचे ठरवल्यानंतर वाट बदलायची सवय सांगोलेकरांना नाही. आणि ती वाट दाखवण्याचे काम गणपतराव देशमुखांनी केले असे म्हटले तर अतिशोयक्ती ठरणार नाही असेही ते म्हणाले.
मी काँग्रेसच्या विचारांचा होतो. माझं सगळं घर शेकापच्या विचारांचे होते. त्यामुळे गणपतराव देशमुखांच्या कुटुंबाकडे जाणे येणे असायचे. अनेक छोट्या-मोठ्या मुद्द्यांवरून घरातले लोक शेकापच्या संघर्षात सहभागी होत असत.
हे सगळ्या गोष्टी मी माझ्या घरात बघितल्या आहेत. या सगळ्यात शेकापची एक आघाडीची फळी होती. त्यात गणपतराव देशमुखांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल असेही पवारांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस हा महत्वाचा पक्ष होता. पण १९५० मध्ये काँग्रेस पक्षात मतभेद झाले. यावेळी काही लोकांनी काँग्रेस पक्ष शेतकरी हिताचा नाही अशी भूमिका मांडली. त्यानंतर काही नेतेमंडळींनी कष्टकरी , शेतकरी वर्गाचा हित जपणारी एक विचारधारा वाढवली पाहिजे असे मत मांडले.
त्यात काही जिल्हे या विचारधारेला मोठी ताकद देणारे होते. या चळवळीतून काही तरूण नेते शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ठामपणे मांडत होते. त्या तरूण नेत्यांच्या मालिकेत गणपतराव देशमुखांचं नाव कटाक्षाने घ्यावे लागेल असे पवार म्हणाले.
मला त्यांच्यासमोर विधीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. मी राज्याचा प्रमुख असताना माझ्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी गणपतरावांना मिळाली. रायगड जिल्ह्यातील शेकापच्या नेत्यांचा मोठेपणा असा आहे, ज्यावेळी मंत्रिमंडळ विरोधकांचं होतेय हे समजल्यावर रायगड,
शेकापमध्ये अनेक सहकारी होते. त्यांनी आपली संख्या जास्त असताना सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायची ताकद, सार्वजनिक जीवनातला स्वच्छ कारभार यांचा आदर्श ठेवत रायगड जिल्ह्यात मंत्रिपद मागितले नाही. तर गणपतराव मुख्यमंत्री झाले पाहिजे हा मोठेपणा त्याकाळच्या रायगड जिल्ह्यातील नेत्यांनी दाखवला.
मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम केले. पण अत्यंत स्वच्छ कारभार,विचारांची स्पष्टता, आणि लोकांशी बांधिलकी या तीन गोष्टींच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही असेही पवार यांनी यावेळी सांगितले.



0 Comments