राजकीय निर्णय नेते नाही तर ईडी घेते, कोण कुठल्या पक्षात जायचं हे ईडी ठरवते
असं सोडून गेलेल्या सहकाऱ्यांनी सांगितलं; शरद पवारांचा मोठा दावा
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्या मागे काही नेत्यांवर असलेल्या ईडीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा होती.
आता ती गोष्ट खरी असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मान्य केलंय. आपल्याला सोडून गेलेल्या सहकाऱ्यांनी त्यांच्यामागे ईडीची कारवाई हे कारण असल्याचं सांगितलं होतं असा दावा शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "आपल्यासोबतचे काही सहकारी भाजपसोबत सत्तेत गेले. त्या आधी कोणताही राजकीय निर्णय हे राजकीय नेते घ्यायचे, पण आता राजकीय निर्णय ईडी ही संस्था घेते असं आपल्या सहकाऱ्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं. ईडी ठरवते कोणत्या पक्षात कोण जायचं ते."
मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक असून मोदी सरकार यावर फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मणिपूरमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र यांनी त्या ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.
मोदी म्हणाले, ते पुन्हा येणार
मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुढच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला होता. त्यावर शरद पवारांनी चांगलीच टीका केलीय. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनीही या आधी मी पुन्हा येणार असं सांगितलं होतं,
पण ते आले ते दुसऱ्याच पदावर. मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, आताही जातीय तेढ निर्माण करण्याची मोदी सरकारची भूमिका आहे.
अजित पवारांसोबत पुण्यामध्ये भेट झाली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. पण या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी तयार असल्याच्या या केवळ चर्चा असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
बीडच्या सभेनंतर पुन्हा दौरा करणार
येत्या काळात जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार असल्याचं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, "गेल्या आठ दिवसांपासून राज्यात ननवे कार्यकत्यांशी संवाद साधत आहे. सोलापूर, सांगोला या भागात प्रवास करताना एक हजार लोकांनी वाहन थांबवलं,
समर्थनाची भूमिका सांगितली. औरंगाबादला महाराष्ट्र काव्यक्षेत्रात मोठं योगदान आलेल्या नाधो यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला हजेरी लावली. आज त्यांच्या गावी जाऊन आलो. उद्याच्या बीडमधील सभेनंतर काही गॅप घेऊन पुन्हा दौरा करणार आहे."


0 Comments