पावसाअभावी सांगोला तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण हक्काच्या
पाण्यासाठी राजकारण्यांची आश्वासने ; पाण्याअभावी शेतकरी मात्र हतबल
नीरा उजवा पाण्यासंदर्भात नेत्यांचे आश्वासने तर अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट अशी परिस्थिती झाली आहे. नियमाप्रमाणे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी मात्र दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या राजकीय कुरघोडीमुळे हतबल झाला आहे.
पावसाअभावी सांगोला तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या वेळेवर निरा उजवा कॅनॉलचे पाणी मिळाले नसल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. नीरा उजवा फाटा क्रमांक आठला नियमाप्रमाणे 'टेल टू हेड' पाणी मिळणे गरजेचे होते.
परंतु तसे पाणी मात्र अद्यापही मिळाले नाही. अधिकाऱ्यांचा गलथान कारभार व त्यातच पाण्यात होणारा मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप यामुळे सध्या प्रत्येक जण आप-आपल्या तालुक्याच्या पाण्यासाठी आपली ताकद अजमावत आहे.
सांगोला तालुका शेवटी असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना फक्त आश्वासनेच मिळत आहेत. तालुक्यातील फाटा क्रमांक पाचला आंदोलनानंतर पाणी सोडले आहे. परंतु नियमाप्रमाणे फाटा क्रमांक आठला हक्काचे पाणी मिळाले नाही.
पाणी पाहिजे त्या दाबाने मिळत नसल्याने दुष्काळातही शेतकरी पाण्यातील राजकारणाचा बळी ठरत आहे. अधिकारीवर्ग नियमानुसार पाणी वाटप का करत नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या हक्काच्या पाण्यासाठी लवकरच न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
राजकारणातच मुरतयं पाणी -
सांगोला तालुक्याला दुष्काळी परिस्थितीत आंदोलने केल्याशिवाय पाणी मिळत नाही. पाण्यासाठी लढणे ही परंपराच तालुक्यात निर्माण झाली आहे. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी सध्या पाण्यातच मोठ्या प्रमाणात राजकारण होते
की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणी मंडळी शेतकऱ्यांवर पाणी मिळेविण्यासाठी दिवसेंदिवस आश्वासने देतात, बैठका घेतात, अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र कॅनॉलमध्ये 'टेल टू हेड' पाणी येत नाही. अधिकारीही याविषयी काही बोलत नाहीत त्यामुळे राजकारणातच पाणी मुरतंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हक्काच्या पाण्यासाठी करणार तीव्र आंदोलन
नीरा उजवा फाटा क्रमांक आठला प्रथम पाणी देणे आवश्यक होते. परंतु पाण्याच्या राजकीय कुरघोडीमुळे, अधिकाऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले नसल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. पाण्याच्या या अन्यायाबाबत शेतकऱ्यांना घेऊन नीरा भाटघर पंढरपूर येथील कार्यालयासमोर 31 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची माहिती अभिजीत नलवडे यांनी दिली.


0 Comments