खळबळजनक घटना... पत्रकाराची बातमी झोंबली, आधी शिवीगाळ, आता मारहाण
सध्या अलीकडे राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर शिंदे सरकारचा अंकुश नाही, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना काल भर रस्त्यात जबर मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गट शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महाजन यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ करून धमकी दिली होती.
जळगाव जिल्ह्यात अलीकडेच एका अल्पवयीन मुलीचे अत्याचार आणि हत्या प्रकरण घडले होते. दरम्यान, यावरून पत्रकार महाजन यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावरून आमदार पाटील खूप संतप्त झाले होते.
त्यांनी महाजन यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली होती. याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडीओ क्लिप माझीच असल्याचे सांगत पाटील यांनी, पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. मी माझे शब्द मागे घेणार नाही, असे सांगितले होते.
त्यापाठोपाठ आता पत्रकार महाजन यांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. पत्रकार महाजन हे काल गाडीवरून जात होते. त्यावेळी त्यांना आमदार पाटील समर्थकांनी अडवले. त्यांना दुचाकीवरून खाली पाडले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
ही सगळी घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. मारहाणीनंतर पत्रकार महाजन यांनी आमदार पाटलांवर आरोप करून त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या संतापजनक घडामोडींबाबत शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची… का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून! मुख्यमंत्री शिंदे साहेब, सत्तेची नशा, अशी असते का? असा सवाल त्यांनी केला आहे.


0 Comments