धक्कादायक प्रकार...आमटी चांगली झाली नाही म्हणून तो भडकला
आणि संपूर्ण कुटुंबाच्या जीवावरच उठला ; तिहेरी हत्येने गाव हादरलं
राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात केलेली कृती नंतर पश्चाताप करायला भाग पाडते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि अपरिमित नुकसानही झालेलं असतं.
असाच एका इसमाचा राग त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला आणि हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्धवस्त झालं. जेवणावरून झालेल्या शुल्लक वादानंतर एका इसमाने त्याची पत्नी आणि दोन लहान निरागस मुलींची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील महोबा येथे हा तिहेरी खुनाचा प्रकार घडला असून संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. क्रूरतेची परिसीमा गाठत त्या विक्षिप्त व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप मुलींवर धारदार शस्त्रे आणि विटांनी वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेसह दोन लहान मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू केला. ही क्रूर घटना महोबा शहरातील कोतवाली भागातील समद नगर परिसराती घडली.
तेथे राहणाऱ्या देवेंद्रने पत्नी रामकुमारी आणि त्याच्या ९ आणि ६ वर्षांच्या दोन निष्पाप मुलींची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी देवेंद्र घटनास्थळावरून फरार झाला मात्र पोलिसांनी कसून शोध घेत त्याला रेल्वे ब्रिजखालून ताब्यात घेत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा पती देवेंद्र यांच्यात सतत भांडणं सुरू असायची, वादही व्हायचे. या दुर्दैवी घटनेच्या दिवशी आमटी चांगली झाली नाही, पातळ झाली या मुद्यावरून दोघांमध्येही पुन्हा भांडण झाले.
मात्र या भांडणाचे वादात पर्यवसन झाले आणि संतापलेल्या देवेंद्रने दोन लहान मुली आणि पत्नीच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments