ब्रेकिंग न्यूज.....उजनीच्या उचल दोन टीएमसी पाण्याचे लवकरच भूमिपूजन - आमदार शहाजी पाटील
गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या उजनीचे दोन टीएमसी उचल पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सांगोला तालुक्यातील वंचित असलेल्या १६ गावातील शेतीच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार
सांगोला - स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन (उजनी उचल पाणी) योजनेस शासन निर्णयाच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून पुर्व मान्यता मिळाली आहे. येत्या महिन्याभराच्या काळात या योजनेच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या उजनीचे दोन टीएमसी उचल पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सांगोला तालुक्यातील वंचित असलेल्या १६ गावातील शेतीच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.
युती सरकारच्या काळात १९९७ साली मंजूर झालेली उजनी उपसा सिंचन योजना अनेक वर्षे रखडलेली होती. शिंदे - फडणवीस सरकारने दुष्काळी १३ तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना मार्गी लावण्याचा घेतलेल्या
निर्णयापैकी उजनी उपसा सिंचन योजनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला नाव देऊन यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागणी पूर्ण केली.
आमदार शहाजी पाटील यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे या योजनेस मुख्यमंत्री यांची मान्यता मिळणे बाबत शासनास प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेस पूर्व मान्यता दिल्याचे शासनाचे उपसचिव प्रसाद नार्वेकर यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
त्यामुळे या योजनेचा पुढील प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रलंबित उजनी उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मदत केल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.
उजनीचे दोन टीएमसी उचल पाणी योजनेस पूर्व मान्यता दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. येत्या १० दिवसात प्रशासकीय मान्यता मिळताच
योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. सांगोला तालुक्यातील कोणत्याही कामास निधी निश्चितपणे कमी पडू देणार नाही.
- शहाजी पाटील, आमदार, सांगोला.


0 Comments