धक्कादायक घटना.... किचन मध्ये मृतदेह शिजवायचा आणि जेवायला बाहेर जायचा; मनोज सानेचे अंगावर शहारे आणणारे क्रौर्य
लिव्ह इन मध्ये राहणार्या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे कऱणार्या मनोज साने याला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याने हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झाले नाही.
सरस्वती वैद्यचे तुकडे पोलिसांनी जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे. हत्या करून ज्या प्रकारे त्याने मृतदेहाचे असंख्य तुकडे केले ते क्रौर्य अंगावर शहारे आणणारे आहे.
मीरा रोडच्या गीत नगर मधील गीता दिप इमातीच्या ७ व्या मजल्यावर मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे मागील ५ वर्षांपासून भाड्याच्या सदनिकेत रहात होते. बुधवारी संध्याकाळी त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
साने याने सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्या तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवत होता. त्याला बुधवारीच अटक करण्यात आली. गुरूवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता साने याला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावाण्यात आली आहे.
बाथरूम मध्ये मृतदेह आणि किचन मध्ये तुकडे
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) जयंत बजबळे यांनी सांगितले की, ४ जूनच्या पहाटेपासून त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरवात केली, त्याने सरस्वतीचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता.
तिचे तुकडे तो किचन मध्ये करत होता. यासाठी त्याने विद्युत करवत (इलेक्ट्रीक सॉ) एक्सॉ ब्लेड असे साहित्य हत्येच्या दिवशीच विकत घेतले होते.
त्यांच्या सहाय्याने त्याने मृतदेहाचे असंख्य तुकडे केले.हाड आणि मांस वेगळे करण्यासाठी तो कुकर मध्ये शिजवत होता. पोलिसांना घरात असंख्य तुकडे सापडले. ते कुकर, ३ पातेले आणि २ बादल्या भरून होते.
डोक्याचे देखील त्याने असंख्य तुकडे केले होते. हे सर्व तुकडे मोजण्याच्या पलिकडचे आहेत. आम्ही ते जेजे रुग्णालयात पाठवले आहेत.
त्यानंतर कुठला भाग गायब आहे ते समजले असे बजबळे यांनी सांगितले. यातील काही तुकड्यांची त्याने विल्हेवाट लावली होती.
हत्येनंतर सर्वसाधारण आयुष्य
मनोज साने हा मुूळचा बोरिवली येथे राहणारा आहे. तेथील एका शिधावाटप दुकानात तो काम करतो. २९ मे पासूनच हे दुकान बंद आहे. सरस्वतीची हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हत्या केल्यानंतर तो घरातच होता. किचनमध्ये मृतदेह शिजवत असल्याने तो दुपारी आणि रात्री जेवायला बाहेर जात होता. त्याचे वागणे एकदम साधारण होते, असे पोलिसांनी सांगिते.
अनाथ होती सरस्वती
बोरीवलीच्या शिधा वाटप दुकानात मनोज साने काम करत होता. २०१४ मध्ये तेथे त्याची ओळख सरस्वती वैद्य बरोबर झाली.
ती अनाथ होती. तेव्हापासून ते एकत्र राहत होते. सरस्वती अहमदनगरच्या जानकईबाई आपटे अनाथाश्रमात रहात होती. पोलीस तेथून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
हत्येनंतर मनोज साने एकदम शांत असून तो पोलिसांची दिशाभूल करत आहे. सरस्वतीने विष प्राशन केल्यानंतर मी घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तो सांगत आहे.
मात्र त्याचा दावा खोटा असून आम्ही सर्व शक्यता पडताळून तपास करत असल्याचे उपायुक्त बजबळे यांनी सांगितले.


0 Comments