सांगोला तहसील कार्यालयाचे माझे भावनिक नाते - वडीलाने शिपाई म्हणून काम केलेल्या
तहसील कार्यालयातच मुलाने घेतला तहसीलदार पदाचा कार्यभार
सांगोला - वडील ज्या तहसील कार्यालयात शिपाई होते, त्याच तहसील कार्यालयात मुलांने तहसीलदार म्हणून पदभार घेतल्याची घटना सांगोला तहसीलमध्ये घडली आहे.
सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार अभिजीत सावर्डे - पाटील यांचे उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. येथील तहसिलदारपदी संजय खडतरे यांनी सोमवार
(ता. ५) रोजी पदभार स्वीकारला. यावेळी नायब तहसिलदार किशोर बडवे, हरिभाऊ जाधव, विकास माळी यांचेसह महसूल आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नूतन तहसिलदार संजय खडतरे सांगोला येथीलच रहिवासी आहेत. तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ते थेट सांगोल्यातच रुजू झाले आहेत. वडील ज्या तहसील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. त्याच कार्यालयात त्यांनी तहसीलदार म्हणून रुजू होऊन कामास सुरुवात केली आहे.
1986 साली तहसील कार्यालय शिपाई असणारे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर 1992 मध्ये ते त्याच कार्यालयात क्लार्क म्हणून अनुकंपाखाली रुजू झाले होते. या अगोदर खडतरे यांनी सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर,
येथे महसूल क्लार्क म्हणून उत्कृष्ठ काम केले आहे. २०१६ साली त्यांची मावळ (जि. पुणे) येथील प्रांत कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून पदोन्नती झाली. त्याठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
सांगोला येथे पदोन्नतीवर तहसिलदार म्हणून नेमणूक झाली आहे. सोमवार (ता. ५) रोजी सांगोला तहसिलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सामान्य नागरिकांना कोणत्याही विभागात त्रास होणार नाही
यासाठी नवी रूपरेखाच ठरवून दिली. वेळेत कामे न झाल्यास किंवा कामकाजात हायगय करणाऱ्या कर्मचाऱ्या मी पाठीशी घालणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
सांगोला तहसील कार्यालयाचे माझे भावनिक नाते -
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन तहसीलदार संजय खडतरे यांनी सांगोला तहसील कार्यालयाचे माझे अत्यंत भावनिक नाते असल्याचे सांगितले. माझे वडील याच कार्यालयात शिपाई होते. मी ही काही काळ येथे काम केले आहे. त्याच कार्यालयात मी आज तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर माझे ह्रदय भरून आले आहे.
मी येथीलच रहिवासी असलो तरी कामकाजाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार नसून सामान्य नागरिक केंद्रबिंदू मधून मी काम करणार आहे. आपल्या गावातच काम करावे लागत असल्याने मनस्वी आनंद होत आहे असेही तहसीलदार संजय खडतरे यांनी सांगितले.
काम करण्यास मिळणार फक्त तीन महिने -
पदोन्नतीने सांगोल्यातीलच रहिवासी असलेले नूतन तहसीलदार संजय खडतरे यांना निवृत्ती होण्यासाठी फक्त तीन महिन्याचा अवधी राहिला आहे.
त्यामुळे आपल्या शहरात तहसीलदार म्हणून काम करण्यासाठी त्यांना तीन महिनेच मिळणार आहेत. या तीन महिन्यात कामकाजाच्या बाबतीत त्यांनी 'नायक' व्हावे अशी अपेक्षा सांगोलकरांना वाटत आहे.


0 Comments