google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात अप्रुपा, माण, कोरडा नद्यांच्या संगमामुळे काशीगमनाचा आनंद पण... माणनदीचा श्‍वास पुन्हा गुदमरतोय!

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात अप्रुपा, माण, कोरडा नद्यांच्या संगमामुळे काशीगमनाचा आनंद पण... माणनदीचा श्‍वास पुन्हा गुदमरतोय!

 सोलापूर जिल्ह्यात  अप्रुपा, माण, कोरडा

नद्यांच्या संगमामुळे काशीगमनाचा आनंद पण... माणनदीचा श्‍वास पुन्हा गुदमरतोय!

सोलापूर : माणगंगेचे पुनरुज्जीवन करुन तिचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी माण भागातील रहिवाशांनी अखंड प्रयत्नातून नदीपात्राचा श्‍वास मोकळा केला.

 लोहसहभागामुळे ओढ्याचे रुप आलेल्या माणनदीला पुन्हा नदीचे रुप प्राप्त झाले. नदी प्रवाहाची व्याप्ती वाढली.

 गेल्या दोन-चार वर्षात पुन्हा मूळ रुप प्राप्त होऊ लागल्याने नदीपात्र स्वच्छतेचे श्रम वाया जाण्याची भिती आहे. 

प्रशासनाने वेळीच दक्षता घेत योग्य पावले उचलली नाहीत तर मोकळा श्‍वास घेणाऱ्या नदीचा श्‍वास पुन्हा गुदमरणारच!

सोलापूर जिल्ह्यात उजनी, हिप्परगा (एकरुख), होटगी, बोरी (कुरनूर), सोरेगाव, आष्टी अशा विविध जलाशय परिसरात तसेच कुडल 

संगमसारख्या ठिकाणचे पर्यटन वाढून तेथील व्यापार-उदीम वाढण्याची व परिसर विकासाची ‘सकाळ'ची भूमिका आहे. 

उजनी, हिप्परगा, बोरी धरणावर तर पर्यटनाबरोबरच देश-विदेशातील पक्ष्यांचा अधिवास लाभत असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात एक वेगळाच मानाचा तुरा खोवला जातो. 

एकीकडे या जमेच्या बाजू असताना सोलापूर जिल्ह्यातील नद्यांमधील बेसुमार वाळू उपशामुळे नद्यांचा जीव घुसमटत असल्याचे बिभत्स चित्र दिसत आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही चोरी-छुपे वाळू उपशाचे प्रकार दिवसाढवळ्या होत असल्याच्या तक्रारी आहेतच.

 पोलिस, जिल्हा प्रशासनाची या बाबींकडे होणारी डोळेझाक गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होण्यास कारणीभूत तर ठरत आहे. तसेच निसर्गाच्या ठेव्यावर डल्ला मारल्याने पर्यावरणाची होणारी हानी न भरुन येणारी आहे. 

बेसुमार वाळू उपसा, नद्यांमधून वाढलेली काटेरी झुडूपे, दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण हे भयानक चित्र पाहून अशा प्रकाराविरोधात जावून काही काम करण्याची कोणाचीही धमक नव्हती.

परंतु, सांगोल्यातील माणगंगा भ्रमणसेवा बहुद्देशीय सेवा संस्थेच्या सदस्यांनी माण नदीची परिक्रमा करून नदीच्या वेदना जाणून घेतल्या. 

लोकसहभागातून या नदीचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली. मात्र काम दिसल्याशिवाय तसेच विश्‍वासार्हतेशिवाय निधी जमणे अवघडच होते. 

त्यामुळे सुरवातीला पुस्तक विक्रीतून त्यांनी आपला निधी जमा केला. त्यानंतर मात्र सदभावनेतून मदतीचा प्रचंड ओघ वाढला. या सहकाऱ्यांनी नदी स्वच्छ करण्याचे हाती घेतलेले काम पूर्ण झाले.

 दोन वर्षांपूर्वी जोरदार पावसामुळे या नदीचा कायापालट झाल्याचेच नयनमनोहर दृश्य पहावयास मिळाले. वाढेगाव (ता. सांगोला) येथून जवळच अप्रुपा, माण, कोरडा या तीन नद्यांचा संगम आहे.

उत्तर दिशेने वाहणाऱ्या या तीनही नद्यांच्या संगमामुळे काशीगमनाचा आनंद मिळतो. 

या तीन नद्यांच्या संगमामध्येच एक बेट आहे. त्यावर पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे. २०० वर्षापूर्वीचा एक वृक्षही इतिहासाची साक्ष देत उभा-आडव्या पद्धतीने वाढलेला आहे.

 नदीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या सहकाऱ्यांनी या बेटावर केलेल्या वृक्षारोपणाचे फलित मिळाले आहे. प्रचंड उन्हाच्या काहिलीतही येथील तापमापीचा पारा अगदी कमी असतो. या बेटावरील सुखद गारवा मनाला स्पर्शून जातो.

इतके सारे सकारात्मक चित्र असतानाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर ही नदी पुन्हा पूर्वपदावर येण्याची भिती आहे.

 शासनाकडून ‘चला जाणून घेऊया नदीला‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे नागरिकांना नदीशी जोडण्याचे काम सुरु असताना माण नदीबाबतची प्रशासनाची उदासिनता फारच गंभीर आहे.

निधीचा विनियोग

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभागाकडून वाढेगाव (ता. सांगोला) येथील त्रिवेणी संगम पर्यटन विकासासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

 त्यातून हे पर्यटनस्थळ विकसित करून मंदिराच्या कट्ट्याभोवती घाट बांधणी, दगडी पिचिंग करणे, सुशोभिकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, बालकांसाठी खेळणी, बेटाचा आकार वाढवण्याचे काम करण्यात येणार आहे.

आव्हानांचा सामना

- नदीत वाढते अतिक्रमण अन् वाळू उपशामुळे अडचण

- नदीपात्रातील विहिरीतून काढलेला कचरा पुन्हा नदीतच

- प्रशासनाकडून तातडीने नदीची हद्द ठरविण्याची गरज

- वाळूमय नव्हे, तर खडकाळ नदीचे स्वरुप

- नदीच्या दुतर्फा वृक्षारोपणाची गरज

लक्षणीय कार्य

- नदी पुनरुज्जीवनामुळे दुष्काळी भागाचा कायापालट

- अभिमान वाटावे असे पुनरुज्जीवनाचे कार्य

- पाणीसाठा वाढण्याची गरज

- नदीचे पूर्वीचे स्वरुप दुर्लक्षित आता लक्षवेधी

- नजरेत भरण्यासारखा लोकसहभाग

Post a Comment

0 Comments