खळबळजनक...महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून नागरिकांची खुलेआम आर्थिक लुट !
नियम धाब्यावर बसवून तिप्पट-चौपट वसुली सुरू !
जादा पैसे उकळणाऱ्या केंद्र चालकांचे तातडीने परवाने रद्द करण्याची गरज !
सांगोला (प्रतिनिधी) ; विविध प्रकारचे शासकीय दाखले,प्रतिज्ञापत्रे काढण्यासाठी सरकारने महा-ई-सेवा केंद्रे सुरु केली आहेत.
परंतु हे केंद्र चालक मनमानी करत असून, खुलेआम विद्यार्थी,नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत.महसूल विभागाने जे दर ठरवून दिले आहेत, त्यापेक्षा तिप्पट ते चौपट पैसे उकळले जात असून,त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोकांची आर्थिक लूट करून नागरिकांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र चालकांचे परवाने तातडीने रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाच्या सेतू सुविधा केंद्राच्या ठेक्याची मुदत संपल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना महा-ई-सेवा केंद्र मधून विविध प्रकारचे शासकीय दाखले काढून घ्यावे लागत आहेत.
तहसील कार्यालयांतर्गत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, जात प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र अशी कागदपत्रे देण्यासाठी सरकारच्या समन्वयाने महा ई सेवा केंद्र स्थापित केले आहेत.
निराधार पेन्शनसाठी,शैक्षणिक कामासाठी, पोलीस भरतीसाठी, तसेच ग्रामपंचायत निवडणूका असल्यामुळे इच्छुक ग्रामस्थ, तरुणांना विविध प्रकारचे दाखले लागत आहेत.
शासकीय सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने सध्या महा ई सेवा केंद्र चालकांना सुगीचेच दिवस आले आहेत.नेमकी हीच बाब लक्षात घेत,
वाणी चिंचाळे ता. सांगोला या ठिकाणी महा-ई सेवा केंद्र चालवण्याचा परवाना असताना शासकीय अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून त्यांच्याशी अर्थपूर्ण वाटाघाटी करून सांगोला तहसिल कार्यालयासमोरच शासनाचे
सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरीत्या महा ई सेवा केंद सुरू केले आहे. या बेकादेशीर सुरू केलेल्या महा-ई-सेवा केंद्रात नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.
या महा-ई-सेवा केंद्रात शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा प्रत्येक दाखल्यासाठी १०० ते २५० रूपये ज्यादा घेतले जात आहेत.प्रत्येक नागरिकाकडून सर्रास जादा पैसे वसूल केले जात आहेत.
विशेष म्हणजे, जादा पैसे घेतल्यानंतर पावती वैगरे दिली जात नाही. या सर्व प्रकाराकडे सांगोला तहसिलदार हे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
तरी वरिष्ठ महसूल अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून सर्व महा-ई-सेवा केंद्र चालकांना नियमानुसार प्रत्येक दाखल्यासाठी आकारण्यात येणारी शासकीय फी दर्शवणारा फलक प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रात दर्शनी भागात तातडीने लावण्यासाठी आदेश देण्यात यावेत.
जे महा-ई-सेवा केंद्र चालक,दिलेल्या परवान्यांचे ठिकाणी केंद्र चालवत नाहीत. किंवा त्यांच्या केंद्रात शासकीय फी दर्शवणारे फलक लावणार नाहीत किंवा नियमापेक्षा जास्त फी आकारून नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत.
अशा महा-ई-सेवा केंद्र चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवण्यात यावा.अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.
0 Comments