गुवाहाटी दौरा गाजवणारे काय झाडी, काय हाटील, काय डोंगार फेम
आमदार शहाजीबापू पाटील आयोध्येला का गेले नाहीत? : हे आहे कारण...
सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन रविवारी आयोध्याचा दौरा करून आले. या दौऱ्याची राज्यात मोठी चर्चाही झाली.
कारण, मुख्यमंत्र्यांनी आपल्यासोबत केवळ आमदारांनाच नव्हे; तर खासदार आणि इतर प्रमुख नेत्यांनाही आयोध्येला नेले होते.
मात्र, त्यात गुवाहाटीचा दौरा गाजवणारे काय झाडी, काय हाटील, काय डोंगार फेम आमदार शहाजी पाटील यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. सहभागी आमदार आणि नेतेमंडळींनीही शहाजीबापूंची आवर्जून आठवण काढली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात करण्यात आलेल्या बंडात आमदार शहाजी पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती.
ते मुंबईहून सूरतमार्गे गुवाहाटीला पोचलेल्या आमदारांमध्ये सहभागी होते. त्याच गुवाहाटीत असताना आमदार पाटील यांना सांगोल्यातील आपल्या कार्यकर्त्याचा फोन आला हेाता.
त्यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या संवादाच्या ध्वनीफितीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. त्यातही 'काय झाडी... काय हाटील अन॒ काय डोंगार..' अशी डायलॉगबाजी करणारे शहाजी पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते.
गुवाहाटी दौरा गाजवणारे आमदार पाटील हे आयोध्येच्या दौऱ्यावर गेले नव्हते. कारण, आमदार शहाजी पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व करतात.
त्यांच्या मतदारसंघात आठ एप्रिलपासून राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन सुरू आहे. या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आमदार शहाजीबापू पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.
एकतर मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचे संमेलन आणि दुसरीकडे श्रद्धेचा विषय असलेला आयोध्या दौरा यामुळे शहाजीबापूंनी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला थांबण्याचा निर्णय घेतला.
स्वागताध्यक्ष असल्याने आपल्या मतदारसंघात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून पाटील यांची जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली आहे, त्यामुळे ते आयोध्येला जाऊ शकले नाहीत.
दरम्यान, गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणारे माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू, कृषीमंत्री अब्दुल सत्तार हेही आयोध्येला गेले नव्हते.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू हे नाराजच आहेत. ती नाराजी बच्चू कडू यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. दुसरीकडे, अब्दुल सत्तार हे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाकरेंची साथ सोडली असे सांगत हेाते.
मात्र, आयोध्येला न जाऊन त्यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. आयोध्येला न जाणे हा त्यांचा राजकीय गणिताच्या दृष्टीने प्रश्न असेल. मात्र, गुवाहाटी दौऱ्यानंतर केलेली बडबड त्यांच्या अंगलट येऊ शकते.
0 Comments