भयंकर घटना.. बेटा तुला परत आणायला पैसे नाहीत गं, बापाचे शब्द;
ठाण्यात अत्याचारग्रस्त मुलीने जीवन संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची बिहारची असून ती शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात एका नातेवाईकाच्या कुटुंबासोबत राहत होती.
१७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नातेवाईकानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी रविवारी तिच्याच नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अलीकडेच तिच्या वडिलांकडे फोनवर तक्रार केली होती.
संबंधित कुटुंबातील एका सदस्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. म्हणूनच ती त्यांच्यासोबत राहण्यास घाबरत होती आणि गावी घरी येऊ इच्छित होती,
असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेच्या वडिलांनी तुला परत येण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे सांगत आणखी काही दिवस तिला तिथेच थांबण्यास सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी मुलीच्या वडिलांना फोन आला की तुमच्या लेकीने आदल्या दिवशी संध्याकाळी घराच्या छताला गळफास लावून घेतला,
असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments