सांगोल्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी
सांगोला (प्रतिनिधी) :-सांगोला तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या पाझर तलावासाठी हा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यातील १७ पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी ९४ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.
या योजनेतून जिल्ह्यात फक्त सांगोला तालुक्यासाठी हा निधी मिळाला आहे. सांगोला तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या पाझर तलावासाठी हा निधी देण्यात आला आहे. यामध्ये सांगोला
तालुक्यातील डोंगरगाव, राजुरी, पाचेगाव येथील तीन पाझर तलाव, लक्ष्मीनगर, हटकर मंगेवाडी येथील तीन तलाव, दहिवली, पालवण, अचकदाणी, कमलापूर येथील तीन तलाव, मेडशिंगी, जुजारपूर, घेरडी आणि जुनोनी येथील आठ अशा १७तलावांचा समावेश आहे.
मेडशिंगी येथील तलावाला सर्वाधिक ४५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातील पूर्ण झालेल्या जलसंधारण योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजने अंतर्गत निधी दिला जातो. या योजनेतून हा निधी या तलावासाठी मिळाला आहे.
सांगोल्यातील या एकूण १७ पाझर तलावांच्या माध्यमातून परिसरातील २८३ हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. या तलावाची पाणी साठवणक्षमता १ हजार ३५० घनमीटर एवढी आहे.
या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत प्रशासनाने मृद् व जलसंधारण विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या सुधारित आराखड्यात या १७ तलावांचा समावेश केला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल.


0 Comments