एक धक्कादायक घटना .. रिक्षाला गाडी काय घासली, थेट केला वृद्धाचा खून !
केवळ रिक्षाला गाडी घासली एवढ्या किरकोळ कारणावरून एका वृद्धाचा खून करण्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य दोन तरुणांना अटक केली आहे.
अलीकडे गुन्हेगारी अत्यंत सामान्य झाली असून सहजच कुणी कुणाचाही खून करू लागले आहे.
अत्यंत किरकोळ कारणासाठी एकमेकांचा जीव घेतल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असून माणसांच्या जीवाची काही किंमत उरलेली दिसत नाही. क्षणिक रागाने केलेले कृत्य आयुष्यातून उठवते आणि तुरुंगात पाठवते हे माहित असूनही अशा घटना घडत असतात. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगावजवळ शिरढोण रस्ता येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली
असून पोलिसांनी मात्र अवघ्या दोन तासात खुनी गुन्हेगारांचा छडा लावला आहे. तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली असून केवळ रिक्षाला गाडी घासली एवढ्या कारणावरून खून करण्यापर्यंत या तरुणांची मजल गेली आहे.
शिरढोण रस्त्यावर वाघोली येथील ६८ वर्षीय बाळासाहेब रामराव शिंदे यांची गाडी एक्सयुव्ही महिंद्रा आणि एक रिक्षा घासली गेली. संजय उर्फ दाद्या तुपसौंदर, योगेश बाबासो कांबळे, आणि एक अल्पवयीन मुलगा, हे तिघेजण त्यांच्या एका मित्राची रिक्षा घेऊन ढालेवाडीकडे निघाले होते.तर शिंदे हे आपल्या गाडीतून शिरढोणकडे निघाले होते.
दरम्यान बोरगाव-शिरढोण रस्त्यावर बाबासाहेब शिंदे यांची महिंद्रा गाडी आणि रिक्षा घासली. यामुळे वादावादी सुरु झाली. अशा वेळी शाब्दिक बाचाबाची होणे स्वाभाविकही असते पण ही बाचाबाची एवढ्यावर थांबली नाही, सदर तिघांनी मिळून वृद्ध शिंदे यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरु केली.
तिघेजण मारहाण देखील करू लागले आणि काही क्षणात चाकूने शिंदे यांना भोकसले. प्राणघातक हल्ला करून तिघेही तेथून पळून गेले पण शिंदे यांचा मात्र मृत्यू झाला. भर रस्त्यावर एका वृद्धाचा खून करून आरोपी घटनास्थळावरून निसटून गेले होते.
या घटनेप्रकरणी तपास करणे पोलिसांच्या पुढे एक आव्हान बनले होते. घटना रस्त्यावर घडली असली तरी यात प्रत्यक्ष पाहणारा कुणीच नव्हता त्यामुळे आरोपी कोण असावेत ?
हा प्रश्न पोलिसांच्या समोर होताच. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतातच हा अनुभव आहे. काही प्रसंगी वेळ लागतो पण येथे तर पोलीस केवळ दोन तासात आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी बेड्या ठोकून आरोपीची वरात पोलीस ठाण्यापर्यंत आणली.
सदर रिक्षा ढालेवाडीच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी तिकडे आपला मोर्चा वळवला आणि चौकशी केली असता त्यांना शिंदे यांच्या गाडीला घासलेली एक रिक्षा आढळून आली. पोलिसांनी लगेच चक्रे फिरवली आणि केवळ दोन तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सापडलेल्या रिक्षावरून धागे जुळवत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्यांनी संजयनगर,सांगली येथील संजय उर्फ दादया तुपसौंदर्य (वय २२,) आणि जत तालुक्यातील गुळवंची येथील योगेश बाबासो कांबळे (वय १९ ) या दोघांसह आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अवघ्या दोन तासात पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले होते.
आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली असून घडी घासल्याचा राग आल्याने आपण हा खून केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एवढ्याशा किरकोळ कारणावरून थेट खून करणे आणि खून करणारे केवळ २२, १९ आणि अल्पवयीन असे असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
0 Comments