मंगळवेढा महसूल विभागात खळबळ 7 हजार रुपयांची लाच घेऊन
मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी घटनास्थळावरून पळून गेला
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने 7 हजार रुपयांची लाच घेतली असून तो लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून पळून गेला आहे.
याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या प्रकरणात आणखी ‘बडे मासे’ यांची नावे एसीबीच्या तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रार याने मित्राच्या शेतजमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ सांगली-सोलापूर असा महामार्ग गेलेला असून त्यामध्ये शेतजमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित झाली आहे.
त्यामुळे सदर पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई रक्कम रुपये १,४३,७९४/- रुपये मंजूर झाले असून सदर नुकसान भरपाई मिळने करिता तक्रारदार त्यांच्या मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत होता.यातील आरोपी खाजगी इसम चव्हाण याने आरोपी सूरज नळे यांच्या वतीने लाचेची मागणी केली.
व आरोपी सूरज नळे यांनी तडजोडीअंती ७ हजार रु लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान सदर लाच रक्कम रुपये ७ हजार रुपये आरोपी सुरज नळे याने स्वीकारून त्यांच्या चार चाकी वाहनातून पळून गेला आहे.
त्यानंतर आरोपी सुरज नळे याला पकडण्याकरिता त्याच्या घराजवळ सापळा लावला असता आरोपी नळे याने त्यांच्या ताब्यातील चार चाकी चाहन बेकायदेशीरपणे तसेच कोणाच्याही जीवाची पर्वा न करता लाच रकमेसह वेगाने पळून गेला आहे.
आरोपी तलाठी सूरज नळे हे लाचेची रक्कम स्वीकारून पथकाच्या जीवितास धोका पोहोचेल अशा रीतीने वाहन चालवून भरधाव वेगाने पळून गेला आहे. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आला नसून आरोपी पंकज चव्हाण यांला त्याच्या राहते निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार मुल्ला, घाडगे, सण्णके, उडाणशिव सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली आहे.
सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments