कंडक्टरला झाली तलफ, बस सोडून झाला दोन तास बेपत्ता, अखेर ---
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाला अचानक दारूची तलफ झाली आणि बस अर्ध्यावर सोडून तो तब्बल दोन तास बेपत्ता झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालक, वाहकाचे वेगवेगळे किस्से ऐकायला मिळत असतात पण आज लातूर जिल्ह्यातील हा किस्सा सगळ्यांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. तलफ ही एक वाईट प्रवृत्ती आहेच पण त्यात दारूची तलफ म्हटलं की काही माणसं कशाचाही विचार करीत नाहीत हे अनेकदा दिसून आले आहे. धावती रेल्वे थांबवून देखील चालक दारू प्यायला गेल्याची उदाहरणे आहेत.
ट्रक चालक तर जिथे दारूची व्यवस्था असेल तेथे ट्रक थांबवून निवांत झोकत बसलेले असतात. ट्रकचालकाचा विषय स्वतंत्र तरी आहे पण प्रवाशांना घेवून जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस देखील दोन दोन तास दारूसाठी एका जागी उभी राहते
असा प्रकार आजवर तरी कुणाच्या ऐकिवात नाही. आधीच बस विलंबाने धावत असते आणि प्रवाशांना पुढे पोहोचण्याची घाई झालेली असते. अशात कंडक्टरच दोन तास गायब झाला तर काय परिस्थिती निर्माण झाली असेल याच सहज अंदाज येतो.
लातूरहून कळंबकडे निघालेल्या कळंब आगाराच्या बसमधील ऑनड्युटी कंडक्टरला धावत्या बसमध्ये दारू पिण्याची तलफ झाली.
बस सोडायची आणि थांबवायची हे तर त्याच्याच हातात. एक घंटी वाजवली की बस थांबते आणि डबल बेल वाजवली की बस पुढे निघते. या घंटीची दोरी वाहकाच्याच हातात असते. त्यामुळे त्याला वाटेल तेथे बस थांबवायला तो मोकळा असतो. आता तर त्याला स्वतः:लाच दारूची हुक्की आली
म्हटल्यावर बसची सिंगल बेल वाजणार आणि बस थांबणारच ! झालेही तसेच ! प्राप्त माहितीनुसार लातूरपासून जवळच असलेल्या काटगाव येथे त्याने सिंगल बेल वाजवली आणि बस थांबवली. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याचे कडेला उभी राहिली आणि कुणालाच काही न सांगता कंडक्टर बेपत्ता झाला.
अचानक अशी अर्ध्या रस्त्यावर बस कशासाठी थांबली आणि वाहक महोदय कुठे गेले ? या प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नव्हती. सगळ्यांच्या नजर वाहकाला शोधत होत्या पण तो कुठेच दिसत नव्हता.
कळंबला निघालेली बस जागीच थांबून होती आणि प्रवासी बेचैन झाले होते. कुणी उगीच खाली उतरून इकडे तिकडे नजर मारत होते आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसत होते.
कुणी पुन्हा पुन्हा घड्याळ पाहात होते तर कुणी नाईलाजाने मोबाईलमध्ये डोके खुपसून बसले होते. बराच वेळ झाला तरी वाहक काही येत नव्हता त्यामुळे घाई असलेले काही प्रवासी आपल्या सामानासह खाली उतरले आणि दुसरी गाडी पकडून पुढच्या प्रवासाला लागले.
काही प्रवासी अजूनही या वाहक महोदयाची वाटच पाहत होते. प्रवासी ताटकळत बसले होते पण वाहक मात्र आपल्या ठिय्यावर मजा मारत होता. प्रवाशांना मात्र याची काहीच माहिती नव्हती. अखेर काही प्रवाशांनी गावकऱ्यांना या वाहकांबाबत विचारले तेंव्हा मात्र प्रवाशांना धक्काच बसला.
गावातील लोकांकडून कंडक्टरबाबत माहिती मिळाली तेंव्हा प्रवाशांनी थेट दारूचा अड्डा गाठला. तब्बल दोन तास झाले तरी तो आपला निवांत ग्लास मागे ग्लास रिचवत बसला होता. त्याला प्रवाशाची काळजी नव्हती की बसची चिंता नव्हती.
प्रवाशांनी त्याला दारूच्या अड्ड्यावर गाठले आणि त्याला बसकडे घेऊन आले. कसाबसा तो बसमध्ये बसला तेंव्हा कुठे बस जागांची हलली. दरम्यान तब्बल दोन तास प्रवाशाना ताटकळत बसावे लागले. आता राज्य परिवहन महामंडळ या वाहकावर काहीतरी कारवाई करीलच पण प्रवाशांना झालेल्या मनस्तापाचे काय ? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहे.


0 Comments