google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला !

Breaking News

शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला !

 शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला !

 संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झालेल्या आणि पक्षीय पातळीवर प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला झाला असून भाजपला मात्र केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राचा मूढ एका सर्व्हेतून समोर आल्यानंतर फडणवीस- शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची परिस्थिती बनली. 

शिंदे गटाने बंड करून केलेले सत्तांतर आणि भाजपने सत्तेत येण्यासाठी खेळलेले डाव यामळे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खुर्ची हिसकावली गेली असली तरी महाराष्ट्रातील जनतेला हे रुचले नसल्याचे सांगितले जात आहे. या सत्तांतराचा मतदाराच्या मनावर नेमका काय परिणाम झाला आहे

 याचे स्पष्ट उत्तर हे निवडणुकीच्या माध्यमातूनच मिळणार आहे. या सगळ्या अस्थिर परीस्तीतीत शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आली आणि मतमोजणीनंतर मतदारांचा कल समोर आला असून महाविकास आघाडीचाच बोलबाला झाला असल्याचे समोर आले आहे. 

पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर भारतीय जनता पक्षाला केवळ कोकणातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नागपूर येथील निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजप पुरस्कृत उमेदवाराने निवडणूक लढवली होती. 

या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून ५ पैकी ३ जागांवर विजय संपादन करता आला आहे. नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद येथील जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या असून नाशिकमधील जाग मात्र महाविकास आघाडीने गमावली आहे. भारतीय जनता पक्षाला केवळ १ जागा मिळाली आहे. 

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूर शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला आहे तर महाविकास आघाडी पुरस्कृत सुधाकर अडबोले हे नागपूरमधून निवडून आले आहेत. त्यांनी पहिल्या फेरीतच मतांचा कोटा पूर्ण केला आणि आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

औरंगाबादेत झाला 'विक्रम"

मराठवाडा शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीनेच विक्रम केला असून आघाडीचे विक्रम काळे यांनी चौथ्या वेळी देखील येथून विजय संपादन केला आहे. 

राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनाच मतदारांनी भरभरून पसंती दिली असून भाजपचे किरण पाटील यांना मतदारांनी नाकारले आहे. काळे यांनी ६ हजार ९३७ मतांनी पाटील यांचा पराभव करून महाविकास आघाडीचा झेंडा मजबुतीने रोवला आहे. 

औरंगाबादमधून शिवसेनेत मोठी बंडाळी झालेली असताना येथे महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे हे या निवडणुकीतील वैशिष्ट्य आहे. भाजपने येथे मोठी ताकद लावली होती पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

अमरावतीतही महाविकास !

अमरावती येथील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली परंतु अखेर येथेही महाविकास आघाडीचा झेंडा लागला. 

महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगाडे हे अमरावतीमधून विजयी झाले तर भाजपचे डॉ. रणजित पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजप उमेदवार रणजीत पाटील यांना ४१ हजार २७ मते मिळाली तर महाविकास आघाडीचे लिगाडे यांना ४३ हजार ३४० मते मिळाली. तब्बल ८ हजार ५५१ मते अवैध ठरविण्यात आली.  

नाशिकमध्ये तांबे चमकले !

नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला असून येथे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना येथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

अपक्ष उमेदवार तांबे यांना ६८ हजार ९९९ मते मिळाली तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते मिळवता आली. सत्यजित तांबे हे कॉंग्रेसमधून बंड करून निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आली होती. 

कॉंग्रेस पक्षाने त्यांचे निलंबन देखील केले आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकरण देखील या उमेदवारीने समोर आले होते आणि अखेर महाविकास आघाडीला येथे पराभव पत्करावा लागला आहे. 

कोकणात भाजप !

कोकण विधान परिषद निवडणुकीतील जागा मात्र भाजपने खेचून घेतली असून राज्यातील पाच जागांच्या निवडणुकीत ही एकमेव जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा येथे विजय झाला 

असून महाविकास आघाडी पुरस्कृत आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. शेकापचे असलेले बाळाराम पाटील यांना केवळ ९ हजार ५०० मते मिळाली तर भाजपचे म्हात्रे यांना २० हजार ८०० मते मिळाली आहेत. 

राज्याचे लक्ष या निवडणूक निकालावर लागले होते आणि महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर राज्याचा कल काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

 त्यात शिंदे गटाच्या अस्तित्वाचा देखील मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सी व्होटर च्या सर्व्हेतून नुकताच महाराष्ट्राचा कल समोर आला असून त्यानुसार राज्यात महाविकास आघाडी वरचढ दिसली आहे. भाजप आणि शिंदे गटासाठी ही फार मोठी धोक्याची घंटा मानली जात असतानाच हा निकाल समोर आला आहे.

 'आमच्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाहीत, त्यावर आम्ही चिंतन करू आणि आवश्यक असणाऱ्या सुधारणा करू' अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर दिली आहे.  महाविकास आघाडीत मात्र जल्लोष साजरा केला जात असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे.

Post a Comment

0 Comments