अत्यंत हृदयद्रावक घटना...नाकातोंडात पीठ जाऊन बालकाचा दुर्दैवी मृत्यू, प्रचंड हळहळ !
पिठाच्या भांड्यावर पडल्याने नाका तोंडात पीठ जाऊन एका ९ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून बालकांकडे किती बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे हेच पुनः एकदा अधोरेखित झाले आहे.
अलीकडच्या काळात बालकाचे आई वडील आपल्या कामात व्यस्त असतात आणि लहान मुलांकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही. वडील कामानिमित्त बाहेर जातात आणि आई घरातील कामात मग्न राहते. मुल रडायला लागले की त्याच्यापुढे एखादे खेळणे टाकले जाते किंवा मुल जरासे मोठे असले की त्याच्या हातात मोबाईल देवून गप्प बसवले जाते.
अशावेळी लहान मुलाने खेळण्यातील वस्तू गिळल्याच्या आणि हा प्रकार पुढे भलताच महागात पडल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतातच. आईचे थोडेसे दुर्लक्ष बालकाच्या जीवावर बेतू शकते आणि हे पुन्हा एकदा समोर आले
असून पीठ नाकातोंडात जाऊन एका नऊ महिन्याच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एवढेसे बाळ अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्याने आक्रोश आणि आकांत यापेक्षा त्या कुटुंबात काही उरलेच नाही.
तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्यामुळे बालकाच्या नाकात आणि तोंडात पीठ गेले, त्यामुळे त्याचा जीव गुदमरला आणि आयुष्य कळण्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला असल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे गावात घडली आहे. घरात ठेवलेल्या पिठाच्या भांड्यावर ९ वर्षाच्या कृष्णराज राजाराम यमगर या बालकाचा तोल गेला.
खेळता खेळता तोल जाऊन तो पिठाच्या भांड्यावर पडला आणि नाकातोंडात पीठ गेले. त्याला श्वास देखील घेता येत नव्हता. हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. बालकाची अवस्था पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला.
गव्हाचे पीठ या बालकाच्या नाका तोंडात गेल्याने गुदमरून या बालकाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तेंव्हा कुटुंबाने आकांत, आक्रोश केला. या घटनेने परिसरात प्रचंड दु:ख व्यक्त होत असून अनेकांना धक्का बसला आहे. लहान मुलांकडे किती बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.


0 Comments