सांगोल्यात “काठीन् घोगडं घेवू द्या की हो, मलाबी जत्रेला येऊ द्या की” चा सूर लावत सांगोल्याच्या यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग तीन वर्षे यात्रेतील मजा व आनंद लुटण्यापासून वंचित राहिलेल्या सांगोल्याच्या ग्रामीण भागातील भाविकभक्तांनी आणि बाल गोपाळांनी यावर्षी सांगोला शहरात भरलेल्या यात्रेसाठी “काठीन् घोगडं घेवू द्या की हो,मलाबी जत्रेला येऊ द्या की” या गाण्याचा सूर लावत यात्रेत
मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सांगोल्याच्या श्री अंबिकादेवी यात्रेला मागील ४-५ दिवसांपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे.
खिलार जनावरे,दुभत्या गाई, म्हशी व गावठी शेळ्या-मेंढ्यांची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून सुप्रसिध्द असलेल्या सांगोल्याच्या या यात्रेला पूर्वीपासूनच खूप महत्व आहे.
दरवर्षी रथसप्तमीच्या कालावधीत भरणार्या सांगोला येथील श्री अंबिकादेवी यात्रेत खिलार गाय व खोंड (बैल) त्याचबरोबर,जातीवंत दुभती जनावरे आणि गांवरान शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी
मराठवाडा व प.महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगांव भागातील शेतकरी बांधव आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात,त्यामुळे यात्रेच्या दरम्यान ८-१० दिवसांत जनावरांच्या या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सुमारे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.
यावर्षी,जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने गाय-बैल बाजारावर बंदी असली तरी,सांगोला यात्रेत सोमवार दि.२३ जानेवारी पासून शेळ्या-मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरविणेत आला असून त्यांच्या खरेदी-विक्रीचा दैनंदिन व्यापार सुरु आहे.
त्याचबरोबर,यात्रा कालावधीत झुला,पाळणा,टोराटोरा,मौत का कुआँ इ.मनोरंजनाची साधने आल्यामुळे “काठीन् घोगडं घेवू द्या की हो, अन् मलाबी जत्रेला येऊ द्या की” म्हणत सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक हौशी लोक आपल्या कुटूंबातील मुलांबाळासह यात्रेत येवून मौजमजेचा आनंद लुटत आहेत.
आपला छोटा-मोठा व्यवसाय करुन चार पैसे मिळवण्याच्या हेतूने आलेल्या अनेक व्यावसायिकांनी या यात्रेत विवीध प्रकारच्या घरसंसार साहित्याबरोबरच,खेळणी,कपडे, भांडी,मिठाई व खाद्य पदार्थांचे स्टाॅल या यात्रेत लावले
असून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी “देशी ऊसाचा ताजा रस” म्हणून ओरडत गर्दी खेचणारे रसपान गृह आणि पावभाजी,वडापाव व आईस्क्रीमचे स्टाॅलही मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत आहेत.
काल शनिवारी रथसप्तमीनिमीत्त श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने महापूजा,महानैवेद्य व भाविकांसाठी रात्री भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
रविवारी शेतीमालाची निवड करण्यात आली असून आज सोमवारी दु. ४ वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आणि शेवटी मंगळवारी सायंकाळी ५ वा. बक्षीस समारंभानंतर फटाक्यांची आतिषबाजी (शोभेचे दारुकाम) करुन यात्रेची सांगता करण्यात येईल.


0 Comments