पट्ठ्याने केली आमदारांकडेच पोरीची मागणी, आमदारांनीही दिला होकार !
मतदारांची आमदारांकडून विविध कामांची अपेक्षा असते पण शेतकऱ्याचा एका पोराने आमदारांना चक्क लग्नासाठी पोरगी बघण्याचेच काम सांगितले आणि आमदारांनीही या तरुणाला नाराज केले नाही.
लोकप्रतिनिधीना निवडून दिले की जनतेची त्यांचाकडून अपेक्षा असते, विविध कामे करून घेण्यासाठी आमदार, खासदार यांच्याकडे जनतेची गर्दी होत असते. विविध शासकीय कामांपासून काही खाजगी कामे देखील लोकप्रतिनिधीना सांगितली जातात. किती आमदार यातील कामे प्रत्यक्ष करतात
आणि किती केवळ आश्वासने देऊन बोळवण करतात हा भाग वेगळा आहे. पण आमदारांना कुठली कामं सांगावीत याचेही काही ताळतंत्र उरले नसल्याचे अनेक घटनातून दिसून येते. कित्येक आमदार जनतेच्या सामान्य कामातही लक्ष घालून जनतेच्या भावना सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतात.
आमदार झाले तरी काहीजण जनतेत राहतात आणि जनताही त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देत असते. कन्नड - सोयगावचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार उदयसिंह राजपूत यांना मात्र एक वेगळाच अनुभव घ्यावा लागला.
अलीकडे तरुणांची लग्न जुळत नाहीत, लग्नासाठी मुली मिळणं हे एक कठीण काम होऊन बसले आहे. एकीकडे मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर दुसरीकडे मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत घट झालेली आहे त्यामुळे लग्नाचे वय उलटून चालले तरी लग्न जुळत नाहीत. लग्न जुळत नसल्यामुळे निराश होऊन तरुण आत्महत्या देखील करू लागले आहेत.
ही एक मोठी सामाजिक समस्या उभी राहिली असताना शेतकऱ्याच्या एका पोराने आमदार राजपूत यांनाच थेट फोन केला आणि लग्नासाठी मुलगी शोधून देण्याची गळ घातली. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण
अशा विषयांची कामे होण्यासाठी लोक आमदार, खासदार यांना फोन करीत असतात पण लग्नासाठी मुलगी शोधून देण्याचे काम देखील एका तरुणाने आमदारांना सांगितले. लग्नासाठी मुलगी शोधून द्या म्हणून या तरुणाने आमदारांना गळ घातली. अर्थातच या विषयाची चर्चा तर होणारच !
खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने फोन करून आमदारांकडे केलेली ही मागणी लोक मोठ्या कुतूहलाने ऐकत आहेत कारण आमदार आणि या तरुणात झालेली फोनवरील चर्चा व्हायरल झाली आहे आणि स्वत: ऐकून ती इतरांना पाठवली जात आहे.
सोशल मीडियावरून या ऑडीओ क्लिपने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तरुणाने लग्नासाठी मुलगी शोधून देण्याची मागणी आमदारांकडे केल्यानंतर आमदार राजपूत यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला आहे.
असली कामे सांगितली म्हणून आमदार चिडले, रागावले नाहीत तर त्यांनी या तरुणाला बायोडाटा पाठवून देण्यास सांगितले आहे. 'तुमचा बायोडाटा पाठवून द्या, बघतो' असे उत्तर आमदार राजपूत यांनी दिले आहे. मुलीची मागणी केली असली तरीही आमदारांनी त्याला नाराज केले नाही.
या संभाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असली तरीही, आणि वरवर हा विषय गमतीचा वाटत असला तरी ही एक मोठी समस्या तरुण वर्गापुढे आहे.
विशेषत: शेतकरी मुलाला तर मुलगी मिळणे ही एक कठीण समस्या बनली आहे. लग्नासाठी मुलगी शोधून देतो म्हणून हल्ली अनेक तरुणांची मोठी फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मुलींच्याही अपेक्षा वाढलेल्या असून शेतकरी मुलाला पसंती दिली जात नाही.
मुलगा मोठ्या शहरात नोकरी करणारा असावा अशाच सूर मुली आणि तिच्या पालकांचा दिसून येतो त्यामुळे शेतकरी मुलांच्या लग्नाचा बिकट प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. नोकरी मिळणे ही सामान्य बाब राहिली नसून शिकलेली मुले देखील शेती करीत आहेत पण त्यांच्यापुढे लग्नासाठी मुलगी मिळवणे हे एक मोठे आव्हान बनलेले आहे.


0 Comments