धक्कादायक घटना.. सोलापुरात 'सैराट': बहिणीच्या प्रियकराचा मर्डर
सोलापूर - अनैतिक संबंधातून मित्राचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व मयताच्या वारसास ७५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन पांढरे यांनी आदेश दिले.
विशाल उर्फ साहेबा सुरवसे (वय-२३,धंदा मजुरी रा.आदर्श नगर शेळगी) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची हकीकत अशी की,आरोपी विशाल सुरवसे यांच्या बहिणीसोबत मयत नितीन नागनाथ उबाळे (रा.भीम नगर, शेळगी,सोलापूर) याचे अनैतिक संबंध होते.
याचा राग मनात धरून आरोपी विशाल यांनी मयताचा शेळगी येथील महालक्ष्मी सोसायटी पाठीमागील नागोबा मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात नेऊन डोक्यात फ्रुट बिअरची बाटली मारून व खाली पडल्यानंतर दोन मोठे दगड घालून गंभीरित्या जखमी करून जीव मारले होते.
मयत नितीन हा महानगरपालिकेत कंत्राट पद्धतीवर काम करत होता.काम न मिळाल्यास तो मार्केट यार्डला जाऊन कांद्याच्या पिशव्या खरेदी करून विक्री करत होता. घटनेच्या दिवशी २६ मार्च २०२१ रोजी मयताचा भाऊ महेश यांनी नितीन यास फोन लावला.
त्यावेळी नितीन यांनी मार्केट यार्ड येथेच आहे. कांद्याची पिशवी विक्री झाली नाही असे सांगितले. त्यावेळी रात्री १० वाजले तरी मयत नितीन हा घरी न आल्यामुळे भाऊ महेश याने पुन्हा फोन केला असता त्याने फोन उचलला नाही.
रात्रभर नितीन घरी आला नसल्याने महेश हा स्वतः मार्केट यार्डात शोधण्यासाठी गेला असता,चुलत भाऊ संतोष उबाळे याने नागोबा मंदिराच्या मोकळ्या मैदानात एका युवकाचा खून झाला असे सांगितल्याने महेश त्या ठिकाणी गेला.
जवळून पाहिले असता तो नितीन असल्याची त्याची खात्री झाली.आरोपी विशाल सुरवसे हा त्याची आई वडील व विधवा बहीण यांच्यासोबत नितीन यांच्या गल्लीत राहण्यास होता नितीन व आरोपीची बहीण यांच्यात अनैतिक संबंध होते. ही बाब समजल्या नंतर त्याला अनेक वेळा समज दिली होती.
या घटनेबाबत फिर्यादी परशुराम उबाळे यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते.या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी यात महत्त्वाच्या ठरल्या.
आरोपी विशाल यानेच मयताचा दगडाने ठेचून खून केल्याचे सिद्ध झाल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रदीपसिंग राजपूत यांनी केला.तो युक्तिवाद ग्राह्य धरून ही शिक्षा ठोकण्यात आली.या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅड.जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड.गणेश पवार,अॅड.शेंडगे यांनी काम पाहिले.


0 Comments