सांगोला - लोटेवाडी म्हसोबा दर्शन घेऊन जाताना पंढरपूर जवळ भीषण अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
पंढरपूर - महूद रस्त्यावर झालेल्या अत्यंत भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला असून कंटेनरने दुचाकीचा उडवल्याने हा भयावह अपघात घडला आहे.
पंढरपूर ते महूद या मार्गावर अलीकडे अपघाताच्या घटना घडत असतानाच आज दुपारी सोनके गावाजवळ काळीज गोठविणारा अपघात घडला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील दोन तरुण लोटेवाडी येथे म्हसोबा दर्शनासाठी गेले होते. दुचाकीवरून ते लोटेवाडी येथे जाऊन परत पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर त्यांच्यावर काळाने घाला घातला.
एका कंटेनरने या दुचाकीला उडविले आणि यात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा अत्यंत भीषण अवस्थेत मृत्यू झाला आहे. रस्त्यावर रक्ताचा सडा आणि डोक्याच्या बाहेर पडलेला मेंदू हे चित्र काळजाचा थरकाप उडविणारे होते. अपघात झाल्यानंतर कंटेनर सोडून चालक पळून गेला असून रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती.
पंढरपूर येथील विठ्ठल रेसिडेन्सी येथे काम करीत असलेले आणि पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील संदीप हणमंत पवार आणि अजनासोंड येथील मनोज शिरगिरे हे पंढरपूरच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना समोर आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अत्यंत भयानक पद्धतीने झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आणि वाहतुकीत व्यत्यय येत होता. पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. रस्त्यावर पडलेल्या मृतदेहाच्या बाजूने वळसा घालून ही वाहतूक पूर्ववत झाली परंतु अपघाताची परिस्थिती पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता.


0 Comments