धक्कादायक प्रयत्न..ऊस तोडीचा वादातून पुतण्याला जाळून मारण्याचा प्रयत्न !
ऊस तोडीचा वादातून पुतण्याला जिवंत जाळून मारण्याचा धक्कादायक प्रयत्न चुलत्यानेच केला असून जमिनीचा वाद किती टोकाला जातो याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
संपत्ती ही नेहमीच नात्याच्या गोडव्यात कडूपणा आणणारी ठरत आहे, साध्या बांधाच्या वादावरून देखील भाऊच भावाच्या जीवाचा वैरी होतो आणि रक्ताची नाती एकमेकांचे पक्के शत्रू बनून जातात.
ग्रामीण भागात तर जमिनीच्या कारणावरून चालणारे वाद पिढ्यानपिढ्या चालू राहतात आणि नात्यागोत्यातच शत्रुत्व जोपासले जाते. असाच प्रकार सख्ख्या चुलते पुतण्यात घडला असून चुलत्याने आपल्या पुताण्यालाच अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत जेज्रुरी पोलिसात दाखल झाला आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे जवळील वाघदरवाडी येथे घडलेल्या या थरारक घटनेची फिर्याद शारदा नानासाहेब भुजबळ यांनी दिली
असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चुलते पुतण्यात जमिनीवरून नेहमीच धुसफूस सुरु होती आणि यातच ऊसतोडीच्या कारणावरून ठिणगी पडली. या ठिणगीचा भडका मोठा झाला आणि वेगळाच प्रकार घडून गेला.
जमिनीत उसाची लागवड केल्यापासून चुलता भास्कर त्रिंबक भुजबळ आणि फिर्यादी शारदा भुजबळ यांच्यात वादाचे प्रसंग सुरु झाले होते. भास्कर त्रिबक भुजबळ यांनी अतिक्रमण करून ऊस लागवड केली होती. भास्कर भुजबळ याने शारदा भुजबळ यांच्या परस्पर ऊसाची तोड बोलावली.
आपल्याला न विचारता ऊस तोडणी सुरु केल्याने ती थांबविण्यासाठी शारदा भुजबळ आपला मुलगा स्वप्नील याच्यासह शेतात पोहोचल्या आणि त्यांनी जाब विचारला. यातूनच वादावादी सुरु झाली. माझ्या कर्जाची रक्कम आधी द्या आणि मगच उस तोडणी थांबवा असे भास्कर भुजबळ म्हणू लागला. यावेळी भास्कर याने शारदा आणि त्यांचा मुलगा स्वप्नील यांना शिवीगाळ सुरु केली.
भास्कर दमदाटी देखील करू लागला आणि यातून हा वाद वाढतच गेला. हा वाद एवढा वाढल की चुलता भास्कर याने पुतण्या स्वप्नील याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटत्या लाकडी टेंब्याने त्याला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने शारदा भुजबळ आणि त्यांचा मुलगा स्वप्नील हे गोंधळून गेले. चुलत्याने पुतण्यास पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यात शारदा, त्यांचा मुलगा स्वप्नील हे दोघेही जखमी झाले. तेथून कशीबशी सुटका करून दोघे निसटले. या थरारक घटनेची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२४, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी भास्कर भुजबळ याला अटक करण्यात आली असून या घटनेची परिसरातील शेतकऱ्यात चर्चा सुरु झाली आहे. रक्ताची नातीही संपत्ती आणि पैशापुढे शून्य होऊन जातात हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.


0 Comments