पिलीव घाटात झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
माळशिरस : तालुक्यातील पिलीव (सुळेवाडी) घाटातील वनविभागाच्या हद्दीत मासाळवाडी तालुका माण,जिल्हा सातारा येथील युवक सुरेश जालींदर नरुटे वय २१ याने ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बारातोंडीच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर मयताचे वडील जालींदर नरुटे यांनी पिलीव पोलीस ठाण्यात दिली आहे.
आत्महत्येचे कारण निश्चित समजले नसले तरी त्याठिकाणी सदरची आत्महत्या मुलीचे आई वडील व मुलीनेही लग्नास नकार दिल्याच्या नैराश्येतुन सदर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खाजगीत बोलले जात होते.
पिलीव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार अभिजीत कणसे,पंडीत मिसाळ,सतीश धुमाळ, अमीत जाधव, यांनी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच घटनास्थळी जाऊन नातेवाइकांच्या समक्ष पंचनामा करुन मृतदेह माळशिरस येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.
शवविच्छेदन केल्यानंतर रात्री मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.सदर युवकाने केलेल्या आत्महत्येचे कारण निश्चित समजु शकले नाही.सदर घटनेचा अधिक तपास ठाणे हवालदार अभिजित कणसे हे करीत आहेत.पिलीव (सुळेवाडी) घाटात या अगोदरही अनेकांनी आत्महत्या केलेल्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे पिलीव घाट हा सुसाईड पॉईंट बनल्याचे पिलीवसह परिसरामध्ये चर्चिले जात आहे.


0 Comments